नागपूर/प्रतिनिधी:
महिला व कायदे ह्यावर मार्गदर्शन करताना डॉ. ऍड. अंजली साळवे, सोबत कार्यशाळेत सहभागी 'साथी'संस्थेच्या अमृता सरकार, मनीष मुदलियार, फादर हेरॉल्ड डिसुझा |
महिलांवर होणाऱ्या हिंसाचाराला सामाजिक, राजकीय, आर्थिक, मानसिक यांसारख्या अनेक गोष्टी कारणीभूत असतात, परंतु बऱ्याच घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणात आर्थिक परावलंबन हे हिंसा सहन करण्याच प्रमुख कारण असल्याने महिलांनी आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महिला व बाल विकास या विषयातील कायदेतज्ञ आणि समुपदेशिका डॉ.ऍड. अंजली साळवे विटणकर यांनी केले.
डोमिनिकन जस्टिस अँड पीस कमिटी, इंडिया च्या विद्यमाने “समाजातील दुर्बल समुदायाचे संरक्षण, कायदे, धोरण आणि धार्मिक अनुयायांची भूमिका” या विषयावरील 23 व 24 मार्च 2019 रोजी, दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन संत चार्ल्स सेमिनेरी, सेमिनेरी हिल्स, नागपूर येथे करण्यात आले होते, त्यावेळि त्या बोलत होत्या. या कार्यशाळेत विविध राज्यातील नन्स आणि फादर असे एकूण चाळीस प्रतिनिधी सहभागी झाले होते.
महिला व कायदा, ह्या विषया अंतर्गत महिला सशक्तिकरण, कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक शोषण व घरगृती हिंसाचार या विषयावरील कायद्याबाबत डॉ.ऍड. अंजली साळवे विटणकर यांनी मार्गदर्शन करतांना विविध यंत्रणांशी गरजू महिलांनी कसे जोडावे यावर विशेष भर दिला. नागपूर डायसिसचे बिशप रेव्ह. तुलीस गोन्साल्विस, फादर पीटर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन झालेल्या या कार्यशाळेत ‘बाल हक्क संरक्षण आणि कायदे’ या विषयावर, मातृसेवा संघ समाजकार्य महाविद्याल नागपूरचे प्राचार्य डॉ.जॉन मेनाचेरी यांनी मार्गदर्शन केले तर तृतीयपंथांचे अधिकार, त्यांची समस्या आणि समाजात त्याबद्दल जनजागृती याविषयावर नवी दिल्ली स्थित ‘साथी’ या संस्थेच्या अमृता सरकार यांनी मार्गदर्शन करतांना त्यांच्याबाबत सामाजिक दृष्टीकोनाचे महत्व विषद केले. समाजातील दुर्बल घटकांच्या अधिकारांचे संरक्षण करताना डोमिनिकन व धार्मिक संघटनांची भूमिका आणि दुर्बल गटांसोबत काम करतांनाचे सुरक्षा उपाय याविषयी ‘साथी’चे प्रादेशिक संचालक मनीष मुदलियार यांनी विस्तृत मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेचे आयोजक व डोमिनिकन जस्टिस अँड पीस चे समन्वयक फादर हॅरल्ड डिसोझा यांनी उपस्थितांचे आभार मानत वर्षभर करण्यात येणाऱ्या कार्याचे नियोजन सादर केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता फादर जेम्स जुवानी, फादर प्रवीण डिसुजा यांनी परिश्रम घेतले.