९२२ कोटी रकमेचा प्रकल्प
केंद्र व राज्य सरकार उचलणार 50-50 खर्च
नागभीड/प्रतीनिधी:
बहुप्रतिक्षित नागभीड-नागपूर या नवीन ब्रॉडगेजला रेल्वे बोर्डाची नुकतीच अंतिम मंजुरी प्राप्त झाली आहे. तसे पत्र रेल्वे बोर्डाने संबंधित विभागाला दिले आहे. यासाठी ९२२ कोटींचा खर्च लागणार असून, अर्धा खर्च केंद्र सरकार आणि अर्धा खर्च राज्य सरकार उचलणार आहे. मंजुरी मिळाल्यामुळे आता लवकरच या नवीन रेल्वे मार्गाच्या ब्रॉडगेजचे काम सुरू होणार आहे.
मागील पंधरा वर्षांपूर्वी या रेल्वे ब्रॉडगेजला माजी रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी तरतूद केली होती. पंरतु या-ना त्या कारणाने हा ब्रॉडगेज मागे पडला होता. याला रेल्वे बोर्डाची मंजुरी मिळत नव्हती. आता खऱ्या अर्थाने नागभीड -नागपूर ब्रॉडगेज रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली असून केंद्र व राज्य सरकार रक्कमेचा अर्धा-अर्धा निधी उपलब्ध करून देणार आहे. नागभीड-नागपूर ब्रॉडगेज हा नवीन रेल्वे मार्ग १०६.१५ किमी अंतराचा असून, यासाठी सिव्हील इंजिनियरिंग विभागाला ६७३.८४ कोटी, ईलेक्टीक इंजिनियरिंग विभागाला १८२.४२ कोटी, तर एसॲण्डटी विभागाला ६५.७४ कोटी असे विभागून रक्कम दिली जाणार आहे. मागील वर्षी हा नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग तयार करण्यासाठी ७०० कोटी रुपयांची गरज होती. पंरतु या प्रोजेक्टमध्ये ईले्ट्रिरक लाईन वगळण्यात आली होती. या नवीन प्रस्तावात नितीन गडकरी यांनी प्रयत्न करून ईले्ट्रिरक लाइनसह ९२२ कोटी रक्कमेचा निधी प्राप्त करून घेतला आहे.
हा नागभीड-नागपूर ब्रॉडगेज सुरू झाल्याने चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा व नागपूर या जिल्ह्यातील नागरिकांना सोयीचे होणार आहे. या पाचही जिल्ह्यात धानासह भाजीपाला, सोयाबिन, फळे यांचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना नागपूर या शहराच्या मोठ्या बाजारपेठेत आपला माल विक्री करण्यासाठी सोयीचे जाणार आहे. त्याबरोबर चार जिल्ह्यातील नागरिकांचा प्रवास सुकर होणार आहे. गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी सेंट्रल बोर्डाच्या बैठकीत वारंवार पाठपुरावा केला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे वारंवार या विषयावर साकडे घालून जनतेची मागणी पूर्ण केली आहे..