वीजजोडणीसाठी 83 हजार शेतकऱ्यांचे अर्ज
नागपूर/प्रतिनिधी:
मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत मे 2019 अखेरपर्यन्त 25 हजार शेतकऱ्यांना वीजजोडणी देण्याचे महावितरणचे उद्दीष्ट असून या योजनेस विदर्भासह राज्यातील शेतकऱ्यांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. या योजनेत सहभागी होण्याकरिता आजपर्यंत विदर्भातील 14 हजार 905 अर्जासह राज्यातील 83 हजार 303 शेतक-यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.
शाश्वतत जलस्त्रोत उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांना पारंपारिक वीजजोडणी मिळण्यात अडचणी आहेत. अशा शेतकऱ्यांना प्राधान्याने सौर कृषिपंप देण्यात येणार आहेत. महावितरणच्या पोर्टलवरून अर्ज केलेल्या 83 हजार 303 शेतकऱ्यांपैकी 25 हजार 595 शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर करुन त्यांना आवश्यक ते पैसे भरण्यासाठी मागणी पत्रही देण्यात आले असून त्यापैकी 9657 शेतक-यांनी आवश्यक त्या रकमेचा भरणाही महावितरणकडे केलेला आहे. विदर्भातील 6520 शेतक-यांना मागणीपत्र देण्यात आले असून त्यापैकी 1953 शेतक-यांनी आवश्यक त्या रकमेचा भरणाही महावितरणकडे केला आहे. यात नागपूर जिल्ह्यातून सर्वाधिक 325 तर त्याखालोखाल वाशिम जिल्ह्यातील 309 शेतक-यांचा समावेश आहे. याशिवाय अकोला जिल्ह्यातील 255, अमरावती जिल्ह्यातील 213, बुलढाणा जिल्ह्यातील 129, यवतमाळ जिल्ह्यातील 23 सोबतच भंडारा जिल्ह्यातील 158, चंद्रपूर जिल्ह्यातील 248. गडचिरोली जिल्ह्यातील 111, गोंदीया जिल्ह्यातील 98 तर वर्धा जिल्ह्यातील 87 शेतक-यांनी पैसे भरले आहेत.
सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्यांकडून ३ अश्वशक्ती डीसी पंपाच्या आधारभूत किंमतीच्या १० टक्के रक्कम आणि अनुसूचित जाती / जमातीच्या लाभार्थ्यांना पंपाच्या आधारभूत किंमतीच्या ५ टक्के रक्कम भरायची आहे. याशिवाय पारंपरिक वीजपुरवठ्यासाठी रकमेचा भरणा करून प्रलंबित यादीत असलेल्या संबंधीत लाभार्थ्यांची रक्कम यामध्ये समायोजित करण्यात येणार असून त्यांना उर्वरित फरकाची रक्कम भरावयाची आहे. या योजमेत सहभागी होण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना ३ एचपीसाठी १६ हजार ५६० (दहा टक्के) तर अनुसूचित जाती / जमाती गटातील लाभार्थ्यांना ८ हजार २८० एवढी भरावी लागणार आहे. तर ५ एचपीसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना २४ हजार ७१० (दहा टक्के) तर अनुसूचित जाती / जमाती गटातील लाभार्थ्यांना १२ हजार ३५५ एवढी रक्कम भरावी लागणार आहे. मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेसाठी पैसे भरलेल्या शेतक-यांना लवकरच सौर कृषिपंपाद्वारे वीजजोडणी देण्यात येणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी www.mahadiscom.in/solar या महावितरणच्या पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महावितरणने या योजनेच्या संदर्भात शेतकऱ्यांकडून वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न व त्यांची उत्तरे असलेली मार्गदर्शन पुस्तिका व व्हॉट्स ॲप अशा माध्यमांचा वापर करण्यात येत असून क्षेत्रीयस्तरावरील सर्व कर्मचारी व अभियंते समाज माध्यमांद्वारे शेतकऱ्यांसोबत संवाद साधत असल्यामुळे शेतकऱ्यांकडून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.