Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, मार्च १४, २०१९

चंद्रपूरात मतदारांच्या सोयीसाठी 2872 व्हीव्हीपॅट

चंद्रपूर/प्रतिनिधी:

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये पारदर्शी मतदान प्रक्रिया व्हावी यासाठी लोकसभा निवडणुकीसाठी या वर्षी प्रथमच व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरीफायबल पेपर ऑडिट्रेल) यंत्रांचा वापर केला जाणार असून महाराष्ट्रातील 48 मतदार संघासाठी 96 हजार व्हीव्हीपॅट यंत्र उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. चंद्रपूरमध्ये 2872 व्हीव्हीपॅट यंत्र दिमतीला असणार आहे.

राज्यातील 96 हजार मतदान केंद्रांवर काम करणाऱ्या 6 लाख कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची कार्यवाही सुरु आहे. त्यांना तीन स्तरावर प्रशिक्षण दिले जाईल. चंद्रपूर मध्ये प्रशिक्षणाचे अभियान मोठ्या प्रमाणात राबविण्यात आले असून प्रत्येक मतदान केंद्राच्या परिसरात या मशीनचे प्रात्यक्षिक देण्यात आले आहे.याशिवाय समाजातील प्रमुख लोकांनादेखील या यंत्राच्याद्वारे इलेक्ट्रॉनिक मशीनद्वारे होणारे मतदान हे सुलभ, पारदर्शी आणि खात्रीलायक असल्याचे पटवून देण्यात आले आहे.

पत्रकारांना देखील जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार व अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या संदर्भातील प्रात्यक्षिक चंद्रपूर येथे दाखविण्यात आले आहे.व्हीव्हीपॅट यंत्रणा ‘ईव्हीएम’ मशिनसाठी पुरक असून मतदान केल्याची पावती या यंत्रांच्या माध्यमातून मतदारास मिळते.

मतदाराने ज्या उमेदवाराला मत दिले त्या संदर्भात माहिती व्हीव्हीपॅट मशिनवरील बटन दाबल्यानंतर मिळू शकेल. मतदान केंद्रांमध्ये हे व्हीव्हीपॅट यंत्र बसविण्यात येणार आहे. मतदान केल्यानंतर 7 सेकंदामध्ये मतदाराला पावती मिळणार असून त्यावर निवडणूक चिन्ह, नाव व उमेदवाराचा मतपत्रिकेतील अनुक्रमांक नमूद असेल. या पावतीमुळे मतदाराला त्याने दिलेल्या मताची खात्री करणे शक्य आहे.

या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सर्वत्र प्रथमच या लोकसभा निवडणुकीत होणार आहे. त्यासाठी राज्याचे मुख्य निवडणुक अधिकारी यांच्याकडून व्हीव्हीपॅट मशिनच्या वापराबद्दल सूचना निवडणूक यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. या संदर्भात विभागस्तरावर प्रशिक्षण घेण्यात आले आहे. मतदान केंद्रांवर जाणाऱ्या सुमारे 6 लाख कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

महाराष्ट्रासाठी सुमारे 1 लाख 35 हजार व्हीव्हीपॅट यंत्र उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यापैकी प्रत्येक मतदान केंद्रावर एक याप्रमाणे 96 हजार आणि चंद्रपूर जिल्ह्यात 2872 यंत्रांचा वापर या निवडणुकीत केला जाणार आहे. तर अतिरिक्त व्हीव्हीपॅट यंत्र झोनल अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.