दहा महिन्यात१६ कोटी रुपयांच्या वीज चोऱ्या उघडकीस
३०३ वीज चोरांच्या विरोधात गुन्हे दाखल
१३ दशलक्ष युनिटची वीज चोरी
नागपूर/प्रतिनिधी:
वीज चोरांच्या विरोधात आक्रमक झालेल्या महावितरणकडून मागील १० महिन्यापासून आक्रमकपणे मोहीम राबविण्यात येत असून या मोहिमेत ७५५७ वीज चोरांच्या विरोधात कारवाई करून त्यांच्याकडून १६ कोटी ३३ लाख रुपयांचा दंड वीज देयकासह वसूल करण्यात आला. नागपूर,चंद्रपूर , गोंदिया, अकोला आणि अमरावती परिमंडलात ३१३ वीज चोरांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत
एप्रिल- २०१८ ते जानेवारी- २०१९ या कालावधीत विदर्भातील सर्व जिल्ह्यात वीज चोरांच्या विरोधात महावितरणकडून ही मोहीम राबविण्यात आली. यात अकोला जिल्ह्यात सर्वाधिक १४७ गुन्हे वीज चोरांच्या विरोधात दाखल करण्यात आले. नागपूर परिमंडलात ७१ गुन्हे दाखल करण्यात आले.
बुलढाणा जिल्ह्यात ३४, गोंदिया जिल्ह्यात १०,भंडारा जिल्ह्यात १३, वाशीम जिल्ह्यात ३, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात १६ वीज चोरांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
विदर्भात ६ हजार ८९२ ठिकाणी वीज मीटरमध्ये फेरफारीच्या घटना घडकीस आल्या. यात सर्वाधिक १५९६ घटना नागपूर जिल्ह्यात ,यवतमाळ जिल्ह्यात ८४५ घटना तर सर्वात कमी २६० घटना गडचिरोली जिल्ह्यात उघडकीस आल्या. १० महिन्याच्या कालावधीत वीज चोरटयांनी वीज मीटरमध्ये फेरफार करून १३ दशलक्ष युनिटची वीज चोरी केल्याचे निदर्शनास आले. महावितरणने वीज चोरांकडून देयकाची रक्कम आणि शुल्कापोटी १४ कोटी ८५ लाख रुपये वसूल केले. अकोला जिल्ह्यात वीज मीटरमध्ये फेरफारच्या ८३५ घटना, बुलढाणा जिल्ह्यात ५८८ घटना, अमरावती जिल्ह्यात ६३६, चंद्रपूर जिल्ह्यात ३४५, भंडारा जिल्ह्यात ३१८, गोंदिया जिल्ह्यात ४०९, नागपूर शहरात २७९, वर्धा जिल्ह्यात ५२२ घटना उघडकीस आल्या.
वीज वापरातील अनियमितता यात देखील विदर्भात ६६५ घटना उघडकीस आल्या. यात वीज चोरटयांनी सुमारे दीड लाख युनिटची वीज चोरी केल्याचे आढळून आले. यात सर्वाधिक ९४ घटना अमरावती जिल्ह्यात, त्या खालोखाल नागपूर जिल्ह्यात ९० घटना आढळल्या. सर्वात कमी १४ घटना वाशीम जिल्ह्यात त्या खालोखाल २४ घटना गोंदिया जिल्ह्यात आढळून आल्या . अकोला जिल्ह्यात ६५, बुलढाणा जिल्ह्यात ३३, यवतमाळ जिल्ह्यात ६०, गडचिरोली जिल्ह्यात ४४,भंडारा जिल्ह्यात ३०, चंद्रपूर मध्ये ७० , नागपूर शहरात ६८,वर्धा जिल्ह्यात ७३ घटना आढळून आल्या. वीज मीटरमधील फेरफारीच्या घटनेची महावितरण प्रशासनाकडून गंभीरपणे दाखल घेण्यात येत असून येणाऱ्या काळात संपूर्ण विदर्भात वीज चोरीला आळा घालण्यासाठी व्यापक मोहीम राबवल्या जाणार असून तसे निर्देश महावितरणच्या परिमंडल कार्यालयांना देण्यात आल्याची माहिती नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांनी दिली.
नागरिकांना विनंती करण्यात येते कि जर आपणास कुठे वीज चोरी आढळून आल्यास महावितरणच्या जवळच्या कार्यालयास संपर्क करून याची माहिती दयावी असे आवाहन करण्यात येत आहे.