ज्ञानरचनावादी अभ्यासक्रमानुसार बालआनंद मेळावा व आठवडे बाजाराचे आयोजन
अण्णापूर - पुणे( प्रतिनिधी )-
शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान मिळावे. व्यवसाय करताना वस्तू खरेदी करून ती वस्तू नफ्यात कशी विकावी हे कौशल्य प्राप्त व्हावे, तसेच ग्राहकांशी कसे बोलावे? आपली वस्तू कशी चांगली आहे हे पटवून देण्याची कला विद्यार्थ्यांनी आत्मसात करून घ्यावी. त्याचबरोबर मुलांना व्यवहार ज्ञान प्राप्त व्हावे या उद्देशाने मुजावरवस्ती (ता.शिरुर ) येथील जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा व आठवडे बाजार भरवला होता. सकाळी -सकाळी शाळेत बाजार भरल्याने एकच किलबिलाट झाला. शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक व शिक्षकांनी काही दिवस आधी विद्यार्थ्यांना कल्पना दिल्याने या आठवडे बाजाराला मोठा प्रतिसाद मिळाला. या बाजारात प्रामुख्याने सध्या शेतात असलेली पिके जास्त प्रमाणात दिसून आली.
कांदा, कांद्याची पात, कोथिंबीर, पालक, वांगी, मिरची, गवती चहाची पाने, हरभरा, चिंचा इत्यादी शेतमाल त्याचबरोबर, कागदाच्या वस्तू, विविध खाद्यपदार्थ विक्री करिता मुलींनी आणले होते. यावेळी फिरता दवाखाना हा अभिनव उपक्रमही शाळेत राबवला गेला.या बाजाराचे उद्घाटन पंचायत समितीचे सदस्य डाॕ.सुभाष पोकळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सदर उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान अनुभवाद्वारे मिळत असल्यामुळे सर्व शाळांमध्ये त्याची अंमलबजावणी व्हावी असे मत यावेळी डाॕ.पोकळे यांनी व्यक्त केली. सदर आठवडे सुमारे तेरा हजार रुपयांची उलाढाल झाली असल्याचे मुख्याध्यापक शोभा घोडे यांनी सांगितले . सदर कार्यक्रमात शाळेला संगणक देणारे मेजर बाबाजी पराड, व शाळेला ११ गुंठे जागा मोफत उपलब्ध करुन देणारे शेतकरी नामदेव दाते यांचा सत्कार यावेळी डाॕ.सुभाष पोकळे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक संघाचे उपाध्यक्ष शिवाजीराव घोडे, रावडेवाडीच्या सरपंच सरुबाई पिंगट ,निमगाव दुडेचे उपसरपंच अमोल घोडे,अध्यक्ष विजय दंडवते,जनार्दन भोरडे,शिक्षक नेते शिवाजी घोडे,शुभांगी नरवडे,मंगल रावडे,महिला , ग्रामस्थ यांचेसह गावातील प्रमुखांनी भेटी देऊन शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक करत खरेदीचा आनंद लुटला.. शाळेच्या जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापिका शोभा घोडे, तंत्रस्नेही शिक्षिका पुष्पा वाळुंज यांनी उत्तम नियोजन केले. तर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय दंडवते, उपाध्यक्ष जनार्दन गोरडेव सर्व सदस्य यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
वाण म्हणून पणती व निरंजनाचे वाटप. लेक वाचवा, लेक शिकवा चा दिला संदेश.
शाळेतील आठवडे बाजार निमित्त शाळेतील शिक्षक व व्यवस्थापन समितीने हळदी-कुंकवाचा कार्यक्रमही केला. स्री सन्मान व भारतीय संस्कृती जोपासण्यासाठी वाण म्हणून पणत्या व निरंजनयांचे वाटप करण्यात आली. त्यातुन स्त्री जन्माचे स्वागत करुन लेक वाचवा, लेक शिकवाचा संदेशही दिला .शाळेच्या वतीने मुख्याध्यापिका शोभा घोडे, उपशिक्षिका पुष्पा वाळुंज तसेच शाळेतील मुली यांच्या हस्ते आलेल्या प्रत्येक महिला पालक व गावातील शाळेला भेट देणाऱ्या महिलांना निरंजन व पणती वाण म्हणून देण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे सदस्य , तसेच रावडेवाडीच्या विद्यमान सरपंच सरूबाई पिंगट यांनी मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये आपल्या पाल्यांना पाठवण्याचे आवाहन यावेळी केले. शोभा घोडे यांनी यावेळी शाळेने राबवलेले विविध उपक्रम व मुलांच्या प्रगतीबद्दल माहिती उपस्थित पालकांना दिली.