चंद्रपूर शहर पोलिसांनी रोखला बालविवाह
चंद्रपूर, दि.27 फेब्रुवारी - शहरातील लालपेठ कॉलरी येथील एका अल्पवयीन मुलीचा विवाह 23 वर्षीय युवकाशी होत असल्याची गोपनीय माहिती शहर पोलिसांना मिळताच पोलिसांनी थेट लग्नमंडप गाठून बालविवाह रोखला.
लालपेठ येथे एका 14 वर्षीय मुलीचा विवाह होत असल्याची माहिती 25 फेब्रुवारी रोजी निनावी फोनद्वारे शहर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून लगेच लग्नमंडप गाठले. पोलीस लग्नमंडपात दिसताच सारेच स्तब्ध झाले. पोलिसांनी अल्पवयीन मुलगी आणि तिच्या नातेवाईकांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. दरम्यान, घटनेची माहिती जिल्हा बालसंरक्षण अधिकारी अजय साखरकर यांना देण्यात आली. माहिती मिळताच अजय साखरकर, समुपदेशिका प्रिया पिंपळशेंडे चंद्रपूर हे शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अपर्णा कोल्हे यांच्या मार्गदर्शनात प्रिया पिंपळशेंडे यांनी अल्पवयीन मुलगी व तिच्या नातेवाईकांचे समुपदेशन केले. बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 नुसार बालविवाहकरणे कायद्याने गुन्हा असून दंड आणि शिक्षेची तरतूद असल्याची माहिती संबंधितांना देण्यात आली. यावेळी मुलीच्या पालकासह तिच्या नातेवाईकांनी मुलीचे वय 18 वर्ष झाल्याशिवाय लग्न करणार नाही, अशी हमी दिल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.
सदर प्रकरण पुढील कारवाईसाठी बालकल्याण समितीकडे सोपविण्यात आले आहे. यावेळी चंद्रपूर शहरचे एपीआय श्री.ठाकूर, पीएसआय श्री.नागपूरे, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी अजय साखरकर, समुपदेशक प्रिया पिंपळशेंडे, नगरसेवक बंटी परचाके यांनी हे प्रकरण हाताळले.
जिल्ह्यात होत असलेल्या बालविवाहाची माहिती कोणत्याही नागरिकांनी ग्राम, तालुका, प्रभाग व बालसंरक्षण समिती तसेच चाईल्ड लाइन 1098 या टोल फ्री क्रमांकावर देण्याचे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अपर्णा कोल्हे यांनी केले आहे.0000