चंद्रपूर/प्रतिनिधी:
महाराष्ट शासनाने जिल्हास्तरीय लघुवृत्तपत्रे दैनिके, साप्ताहिकांना संपुष्टात आणण्यासाठी वेगवेगळे दबाव
तंत्र सुरू केलेले आहे. यामुळे राज्यातील वृत्तपत्रांवर आधारित हजारो कामगार बेरोजगार होतील. शासनाने अन्यायकारक धोरण रद्द करावे या मागणीसाठी महाराष्ट्रातील जिल्हा वृत्तपत्र बचाओ संघर्ष समितीच्या अंर्तगत विदर्भातील विविध जिल्ह्यातील विविध पत्रकार संघटनांनी महाराष्ट्र शासनाचे अर्थ, नियोजन, वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या घरासमोर कस्तुरबा चौकात शनिवारी २३ फेब्रुवारी रोजी ठिय्या आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात चंद्रपूर जिल्ह्यासोबतच नागपूर, वर्धा, यवतमाळ, गडचिरोली, गोंदिया आदी विविध जिल्ह्यातील संपादक, मालक मोठ्या संख्येत उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाने या आंदोलनाची दखल घेतली नाही तर पुढील टप्यात मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हा वृत्तपत्र बचाओ संघर्ष समितीचे अध्यक्ष सत्यनारायण तिवारी, संयोजक बंडू लडके यांनी दिला आहे.
दरम्यान, मुनगंटीवार यांनी जिल्हा वृत्तपत्र बचाओ संघर्ष समितीच्या आंदोलनाची दखल घेत आपले कार्यालयीन सचिवांना आंदोलन मंडपात निवेदन घेण्यासाठी पाठविले आणि मुंबई येथून पत्रकारांशी फोनद्वारे चर्चा करून संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. पत्रकारांनी अधिपरीक्षक, पुस्तके व प्रकाशने यांचे १३ फेब्रूवारीचे २०१९ चे पत्र रद्द करण्याची मागणी केली. कुठल्याही लघु वृत्तपत्रावर अन्याय होणार नाही याची दखल घेण्याचे आश्वासन दिले.तत्काळ मुख्यमंत्री यांच्याशी बैठक लावून लघु वृत्तपत्रावर अन्याय होणार नाही याची दखल घेतल्या जाईल असे आश्वासन देखील दिले. ठिय्या आंदोलनात मुरलीमनोहर व्यास, बबन बांगडे, जितेंद्र जोगड, पुरुषोत्तम चौधरी, किशोर पोतनवार, प्रभाकर आवारी, शंकर झाडे, डी. के. आरीकर, चंद्रगुप्त रायपुरे, जयपूरकर मॅडम, चरणदास नगराळे, सुनील तिवारी आदीसह संपादक, मालक सहभागी झाले होते. .