नागपूर : वस्त्रप्रावरणे असो किंवा अभिनय किंवा कुठलेही सृजनशील कार्य असो, प्रत्येकाची एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण शैली असते. व्यक्तीच्या आवडी निवडीनुसार किंवा पसंतीनुसार ती वेगवेगळी असते. पण, ही विविधता किंवा स्वतंत्र शैली जपणेच महत्त्वाचे असते कारण, तीच तुमची खरी ओळख असते, असे प्रतिपादन ख्यातनाम अभिनेत्री व मॉडेल राधिका आपटे हिने केले. हॉटेल रॅडिसन ब्ल्यू येथे आयोजित पत्रपरिषदेत माध्यमांशी संवाद साधताना ती बोलत होती. ब्लेंडर्स प्राईड मॅजिकल नाईट्सच्या प्रचारार्थ ती नागपुरात आली होती.
राधिका म्हणाली, मी नेहमीच वेगवेगळ्या भूमिका करण्यास प्राधान्य दिले आहे. पारंपरिक भूमिकेच्या चौकटीत राहण्यापेक्षा नवीन, सृजनात्मक आणि सकारात्मक संदेश देणाऱ्या भूमिका करायला मला आवडतात. मीच कशाला पण वर्तमान काळातील बहुतांश बॉलीवूड अभिनेत्री देखील ‘ऑफ बीट’ भूमिका स्वीकारायला आज तयार असतात. लोकांची, समाजाची अभिरुची, मानसिकता बदलली आहे. विविध समस्यांना, प्रश्नांना भिडणाऱ्या भूमिका किंवा विषय चित्रपटात हाताळले जातात. ‘फोबिया’सारखे आगळेवेगळे चित्रपट स्वीकारण्याचा माझा हाच हेतू होता. एका महत्त्वाच्या आणि तितक्याच संवेदनशील व दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या भयगंडासारख्या समस्येवर चित्रपटात भूमिका करणे हा वेगळाच अनुभव असल्याचे राधिकाने सांगितले. माझ्यावर जे ‘मीम्स’ बनविले जातात ते अतिशय कल्पक, सृजनात्मक व आगळेवेगळे असतात. मी देखील त्याचा पुरेपूर आनंद घेते, महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. भरपूर पाणी प्यावे, संतुलित व परिपूर्ण आहार घ्यावा, पुरेशी झोप घ्यावी आणि आनंदात व मुख्य म्हणजे सकरात्मक मानसिकता बाळगत जीवन जगावे, असा संदेशही तिने दिला.