चंद्रपूर/प्रतीनिधी:
आजच्या काळातील पत्रकारिता करायची, तर त्यासाठी योग्य शिक्षण आणि प्रशिक्षण हवेच. माहिती देणे, मनोरंजन करणे आणि शिक्षित करणे हे पत्रकारितेचे मुख्य काम आहे. प्रादेशिक पत्रकारितेचे सातत्याने विस्तारणारे क्षेत्र पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्यांसाठी एक नवे आवाहन म्हणून खुणावत असल्याचे प्रतिपादन बीबीसी इंडियाच्या प्रशिक्षण व्यवस्थापक सारा हसन यांनी केले.
येथील सरदार पटेल महाविद्यालयात जनसंवाद विभागाच्या वतीने ‘माध्यम उद्योगातील संधी’ या अंतर्गत आयोजित परिसंवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आर. पी. इंगोले होते. यावेळी जनसंवाद विभागप्रमुख प्रा. पंकज मोहरीर उपस्थित होते. यापुढील काळ हा सोशल मिडिया व मोबाईलच्या काम करणाऱ्यांसाठी महत्वाचा आहे. वृत्त पत्रकरिता हा सर्व माध्यमांचा पाया आहे. तंत्रज्ञानात होणारे बदल आणि त्यामुळे पत्रकारांपुढील आव्हाने व भविष्यकाळातील संधी, याबद्दल सकारात्मक विचार सारा हसन यांनी मांडले. प्राचार्य डॉ. आर.पी. इंगोले म्हणाले की, पत्रकारितेतील भविष्यकाळ तरुणांना नवीन संधी उपलब्ध करुन देणारा असेल, रोजगाराच्या आणि स्वत:ला सिद्ध करण्याच्या अनंत संधी तरुणाईला उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात प्रा. पंकज मोहरीर यांनी वृत्तपत्र, टेलिव्हीजन, जाहिरात, जनसंपर्क या क्षेत्रात तरुणाईला उत्तम संधी असल्याचे सांगितले. संचालन प्रा. संजय रामगिरवार, तर आभार रवींद्र जुनारकर यांनी केले. कार्यक्रमाला प्रा. संतोष शिंदे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.