चंद्रपूर/प्रतिनिधी:
विदर्भातील महत्वाचा समजला जाणारा विदर्भ साहित्य संघ नागपूरचा काव्यलेखनासाठी दिला जाणारा महत्वाचा प्रतिष्ठित शरदचंद्र मुक्तीबोध उत्कृष्ठ काव्यसंग्रह पुरस्कार आज वि.सा.संघ नागपूर येथे देखण्या आणि दिमाखदार सोहळ्यात चंद्रपूरचे युवा कवी इरफान शेख यांना माझ्यातला कवी मरत चाललाय या कविता संग्रहाला प्रदान करण्यात आला.
92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अरुणाताई ढेरे यांच्या उपस्थितीत व मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांचे हस्ते हा पुरस्कार शेख याना प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे विदर्भाच्या साहित्यक्षेत्रातल्या १९ मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले होते त्यात चंद्रपूरचे कवी इरफान शेख हे अतिशय तरुण पुरस्कार्थी ठरले आहेत.त्यांचा माझ्यातला कवी मरत चाललाय हा काव्यसंग्रह अल्पावधीतच महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला व हा काव्यसंग्रह साहित्यक्षेत्रात चर्चेचा विषय ठरला. अनेक मान्यवर साहित्यिकांनी काव्यसंग्रहावर समीक्षण केले.
अल्पावधीतच या कविता संग्रहाला प्रतिष्ठेचा समजला जाणारा नारायण सुर्वे पुरस्कार नाशिक येथे प्रदान करण्यात आला. तसेच अखिल भारतीय साहित्य संस्कृती महामंडळचा पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे.आणि आज सोमवारी विदर्भ साहित्य संघाच्या वर्धापन दिनी काव्यलेखनासाठी दिला जाणारा महत्वाचा शरदचंद्र मुक्तीबोध उत्कृष्ठ काव्यसंग्रह पुरस्कार आज वि.सा.संघ नागपूर येथे प्रदान करण्यात आला.कवी इरफान शेख यांना मिळालेल्या पुरस्काराने चंद्रपूरची मान आणखी उंचावली आहे.