11 ते 15 जानेवारीच्या कालावधीत चांदा क्लब ग्राऊंडवर
शेतकऱ्यांच्या उत्सवात पाठिशी उभे राहण्याची संधी
चंद्रपूर/प्रतिनिधी:जिल्हा कृषी प्रदर्शनीची तयारी अंतीम टप्यात आली असून जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी चांदा क्लब मैदानाची आज पाहणी केली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.उदय पाटील उपस्थित होते. 11 ते 15 जानेवारी दरम्यान चांदा क्लब ग्राउंड येथे जिल्हा कृषी व सरस महोत्सव तसेच सेंद्रिय शेतमाल विक्री व महिला स्वयंसहायता समूह वस्तूंची विक्री व प्रदर्शनी लागणार आहे. प्रशासनाने यासाठी तयारी सुरु केली आहे.
जिल्हा कृषी व सरस महोत्सव, सेंद्रिय शेतमाल विक्री व महिला स्वयंसहायता समूह आधारे उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री या महोत्सवात एकूण 274 स्टॉलची उभारणी करण्यात येत आहे. शेतीचे साहित्य, तंत्रज्ञान, नवनवीन यंत्रसामुग्री यासोबतच कृषी निविष्ठा, जिल्हा ग्रामीण यंत्रणेच्या महिला स्वयंसहाय्यता गटांच्या मार्फत उत्पादित केलेल्या वस्तूंची विक्री दालन,सेंद्रिय शेती व बचत गटांमार्फत उत्पादीत बचत गटाचे दालन, कृषी यांत्रिकीकरण, एकात्मिक फलोत्पादन, जलयुक्त शिवार, सेंद्रिय शेती, मधुमक्षिकापालन, पशुसंवर्धन, रेशीम उद्योग, दुग्ध व्यवसाय आदींच्या प्रात्यक्षिकांच्या तंत्रज्ञानाची मांडणी करण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती तसेच यशस्वी शेतकरी शास्त्रज्ञ व तंत्रज्ञ, विचारवंत यांच्या भेटीचे देखील आयोजन या दरम्यान करण्यात आले आहे. या कृषी महोत्सवात शासनाच्या कृषी व कृषी संलग्न योजनांची आणि कृषी विद्यापीठाकडे अद्यावत तंत्रज्ञानाची माहिती देखील देण्यात येणार आहे. गृहिणीपासून तर कॉलेजच्या विद्यार्थ्यांपर्यंत आणि बागायतदारापासून तर कोरडवाहू शेती सांभाळणाऱ्या सर्व शेतकऱ्यांपर्यंत सर्वांना उपयुक्त ठरेल अशा पद्धतीच्या ज्ञान व तंत्रज्ञानाची उपलब्धता या कालावधीत चांदा क्लब मैदानावर राहणार आहे. त्यामुळे या कृषी प्रदर्शनाची नोंद आत्ताच आपल्या नियोजनात करावी, असे आवाहनही उदय पाटील व चंद्रकांत वाघमारे यांनी केले आहे.