Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, नोव्हेंबर १५, २०१८

शेकडो एकरातील धान पिके करपली:सर्वेक्षणाची मागणी

चंद्रपूर/प्रतिनिधी:

 मूल तालुक्यातील गांगलवाडी येथील शेतक-यांच्या शेकडो एकर शेतजमिनीतील पिके सिंचनाअभावी नष्ट झाली असल्याने या सर्व शेतक-यांपुढे संकट उद्भवले आहे. शासनाने मूल तालुका दुष्काळ ग्रस्त यादीतून वगळल्यामुळे व या शेतक-यांना नापिकीमुळे झालेल्या नुकसानीचे सव्र्हेक्षण होण्याची शक्यता नसल्याने गांगलवाडी येथील आलेवाही, नवेगांव तसेच गांगलवाडी साजामधील शेतकऱ्यांची एकंदरीत चित्रा आहे. 
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आलेवाही, नवेगांव तसेच गांगलवाडी शिवारामधील शेकडो हेक्टर शेतजमिनी पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीतील गोलाभुज या तलावाच्या पाण्यावर निर्भर आहेत. यंदा अधिका-यांच्या दुर्लक्षित भुमिकेमुळे या जमिनीतील धान पिकाला सिंचनाची व्यवस्था न झाल्याने पिके हातची गेली आहेत. त्यामुळे हजारो रूपए खर्ची घालून हजार रूपयाचे उत्पन्न या शेतीतून होत नसल्यामुळे शेतकरी बांधव विवंचनेत आहेत. त्यामुळे आलेवाही, नवेगांव व गांगलवाडी या शेतशिवारातील नुकसानीचे सव्र्हेक्षण करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांनी केली आहे. 
याच शिवारातील काही शेतक-यांनी हजारो रूपए खर्ची घालत खासगी बोर तसेच इंजिनद्वारा उपलब्ध असलेल्या पाण्याद्वारे आपली पिके वाचविण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांचे हे प्रयत्न यशस्वी न झाल्याने हा खर्च करूनही या शेतक-यांच्या हातात अखेर भोपळाच आला आहे. त्यामुळे मूल तालुका प्रशासनाने या परिसरात नुकसान झालेल्या पिकांचे सव्र्हेक्षण करून पिडीत कास्तकारांना शासन स्तरावरून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे. यंदा शेतकऱ्यांना सिंचनाची व्यवस्था करण्यासाठी पाणी वितरण समितीचे गठन करण्यात आले होते. परंतू ही समिती शेतक-यांना सिंचनाची व्यवस्था करून देण्यात अपयशी ठरल्याने अशा समितीच्या भरवश्यावर सिंचन विभागाच्या अधिका-यांनी न राहता स्वतः उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून आवश्यकतेनुसार शेतक-यांच्या शेतीला वेळीच सिंचनाची सुविधा निर्माण होईल या दृष्टीने अधिका-यांनी पुढाकार घेत आपले कर्तव्य पार पाडावे अशी मागणीही गांगलवाडी तसेच आलेवाही, नवेगांव शेत शिवारातील तसेच या परिसरातील शेतकरी बांधवांनी केली आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.