Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, ऑक्टोबर १२, २०१८

लोडशेडींगचं संकट चंद्रपूरावरही:जिल्ह्यात भारनियमन सुरु

आता चंद्रपूरालाही सोसाव्या लागतील भारनियमनाच्या झळा
ज्यादा वीजहानीच्या G1,G 2,G 3 वाहिण्यावर भारनियमन सुरु 
नागपूर/ललित लांजेवार:
भारनियमन सुरु साठी इमेज परिणाम

राज्यातील चंद्रपूर, खापरखेडा, परळी, नाशिक, भुसावळ येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात कोळशाचा तुटवडा असल्यामुळे राज्यात अघोषित भारनियमन सुरू करण्यात आले आहे. जवळपास 3000 मेगावॅट विजेचा तुटवडा असल्यामुळे हे भारनियमन सुरु करण्यात आलं असल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
त्यामुळे राज्यातील वीजग्राहकांना ऑक्टोबर हिट मधल्या भारनियमनाचा चांगलाच फटका बसणार असल्याचं दिसत आहे.सध्या तात्पुरत्या स्वरूपाचं भारनियमन लागू करण्याचा निर्णय महावीतरणनं घेतला आहे. यात G1, G2 आणि G3 या तीन गटात जवळपास ८ तासांचं भारनियमन लागू करण्यात आलं आहे.

सध्या राज्यात विजेची मागणी १९५०० ते २०५०० मे.वॉ. इतकी असून विजेची उपलब्धता हि १४५०० ते १५००० मे.वॉ.इतकी आहे. वातावरणातील बदलांमुळे वाढणारी विजेची मागणी व पुरवठा यातील तफावत कमी करण्यासाठी महावितरणने विजेचे नियोजन करून पॉवर एक्सचेंजमधून दररोज ३२०० मे.वॉ.पर्यंत तर लघुकालीन निविदेद्वारे १००० मे.वॉ. पर्यंत वीज खरेदी करत आहे.
कुठे असणार बत्ती गुल..
 चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर मंडळांतर्गत जीवती तालुक्यातील शेनगाव वाहिणीवर तर भद्रावती तालुक्यातील ताडोबा वाहिणीवर भारनियमन करण्यात येत आहे.त्यामुळे ताडोबा भ्रमंती करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना देखील या भारनियमनाचा त्रास सहन करावा लागणार आहे.
तर गडचिरोली मंडळांतर्गत येणाऱ्या ब्रम्हपूरी तालुक्यातील गांगलवाडी, मेंडकी, मालडोंगरी, उदापूर, तळोधी , नवेगाव पांदूर, कांपा, टेलिफोन एक्सचेंज, घोडाझरी, मिंडाळा, गिरगाव, सरडपार, गंजुवाही व निफंद्रा तसेच
आलापल्ली विभागातील-टेकडा, बामणी, मेडारम, हर्डा, कोपरअल्ली, मुलचेरा, जिमलगटटा, जगमपूर, घारगाव,भेंडाळा, तडमगाव बोरी, घोटआमगाव, सोनापूर, दहेगाव, तडोधी, येडानूर, जैरामपूर, पेरीमिली, कोठी, कसमसूर, भामरागड, रेपनपल्ली,मललेरा तसेच पोर्ला,येवली,अमिर्झा, गुरूवला, वैरागड, घाटी, फुरसंडी, बेतकी, मुरूमगाव रोड, चातगाव व काटेझरी या सर्व वीजवाहिण्यांवर ५८ टक्यांपेक्षा जास्त वीजेची हानी असल्याने या वाहिन्यांवर जवळपास ०७ तास ४५ मिनीटे ते ९ तास १५ मिनीटांचे भारनियमन दोन टप्प्यांत करण्यात येत आहे.
ज्या ठिकाणी वीजबिलांचा भरणा नियमित करण्यात येत नाही अशा जी-1, जी-2 आणि जी-3 वीज वाहिन्यांवर केवळ ४०० ते ६०० मे.वॉ. विजेचे भारनियमन करण्यात येत आहे. तर नवरात्र उत्सव व सणासुदीच्या काळात राज्यात सायं.६.३० ते १२.०० वा.पर्यंत भारनियमन हे बंद करण्यात येणार आहे.
ऑक्टोबर महिन्यात उन्हाच्या तडाख्यामुळे सर्वच राज्यांमधील वीज कंपन्यांची विजेची मागणी वाढली आहे. त्यामुळे कोळशाचा पुरवठा पुढील काही महिने तरी सुरळीत होण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे महावितरणला थंडी सुरु होण्याची प्रतीक्षा असून त्यानंतर मागणी कमी होईल आणि भारनियमन कमी होईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
या भारनियमनाचा फटका जिल्ह्यातील छोट्या मोठ्या उद्योगांना बसणार असून जिल्ह्यातील नागरिकांना भारनियमनाचा मोठा सामना करावा लागणार आहे. तसेच ऑक्टोबर हिट, कृषी पंप उपसा आणि सणासुदीमुळे विजेच्या मागणीत वाढ होत असतानाच अघोषित भारनियमन सुरु करण्यात आल्यामुळे राज्यातील जनतेनं निराशा व्यक्त केली आहे.





SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.