Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, सप्टेंबर २६, २०१८

डेंग्यू नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करा

आरोग्य सभापती मनोज चापले यांचे निर्देश : लक्ष्मीनगर, धरमपेठ झोनचा घेतला आढावा 
Image result for डेंगूनागपूर/प्रतिनिधी:
  शहरात डेंग्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी मनपाचा आरोग्य विभाग सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. तरीही आता सर्व घरांच्या सर्वेक्षणासोबतच अतिरिक्त यंत्रणेच्या माध्यमातून डेंग्यूच्या अळ्या नष्ट करण्यासाठी प्रयत्न करा. आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करा, असे निर्देश मनपा आरोग्य समितीचे सभापती मनोज चापले यांनी दिले. 
आरोग्य समितीच्या झोननिहाय बैठकांना मंगळवारपासून (ता. २५) सुरुवात झाली. पहिल्या दिवशी लक्ष्मीनगर झोनचा आढावा घेण्यात आला. लक्ष्मीनगर झोनमध्ये आयोजित बैठकीला सभापती मनोज चापले यांच्यासह लक्ष्मीनगर झोन सभापती प्रकाश भोयर, सहायक आयुक्त सुवर्णा दखने, अग्निशमन व विद्युत समितीचे सभापती लहुकुमार बेहते, नगरसेविका विशाखा बांते, उज्ज्वला बनकर, वनिता दांडेकर, नगरसेवक लखन येरावार, वैद्यकीय अधिकारी विजय जोशी उपस्थित होते. 
सदर बैठकीत डेंग्यूवर गंभीर चर्चा करण्यात आली. आरोग्य सभापती मनोज चापले यांनी लक्ष्मीनगर झोनअंतर्गत असलेल्या रुग्णांची माहिती घेतली. घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून जेथे डेंग्यूच्या अळ्या आढळतील, त्या नष्ट करा, असे निर्देश त्यांनी दिले. मनपातर्फे वॉर्डावॉर्डात फवारणी करण्यात येते. मात्र, त्याची माहिती नगरसेवकांना देण्यात यावी, हा मुद्दा उपस्थित नगरसेवकांनी मांडताच फवारणीचे २०-२० दिवसांचे वेळापत्रक तयार करण्यात आले. ज्या प्रभागात ज्या दिवशी फवारणी होईल, त्याच्या तीन दिवस अगोदर फवारणीचे वेळापत्रक नगरसेवकांना देण्यात येईल, अशी माहिती सभापती मनोज चापले यांनी दिली. 
यानंतर स्वच्छ सर्वेक्षण २०१९ अंतर्गत नागपूर महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती घेऊन त्यावर चर्चा करण्यात आली. यावेळी स्वच्छ सर्वेक्षणाचे जे निकष आहेत त्यावर चर्चा करून लक्ष्मीनगर झोनमध्ये त्याची काय तयारी आहे, याची माहिती आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सभापतींना दिली. १८ ऑक्टोबर रोजी दीक्षाभूमीवर होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने तेथे सुरू केलेल्या तयारीचा आढावाही सभापती मनोज चापले यांनी घेतला. देशविदेशातून दीक्षाभूमीवर नागरिक येत असल्यामुळे त्यांच्या सोयीच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश सभापती चापले यांनी दिले. डेंग्यू, स्क्रब टायफस सारख्या रोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन, त्यादृष्टीने आरोग्य विभागाची चमू सज्ज ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. 
खामला आणि सोमलवाडा येथील दवाखान्याचे नूतनीकरण करण्यासाठी आणि तेथील आरोग्य सेवेला उत्कृष्ट बनविण्यासाठी टाटा ट्रस्टच्या माध्यमातून काही करता येईल का, यावरही बैठकीत चर्चा झाली. बैठकीला आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.