Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, सप्टेंबर १२, २०१८

राष्ट्रीय वृद्धापकाळ आरोग्य शुश्रूषा अभियानांतर्गत पहिले पथदर्शी केंद्र मुल येथे

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येपहिले पथदर्शी केंद्र  
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते 14 सप्टेंबरला लोकार्पण
चंद्रपूर/प्रतिनिधी:
 केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचे पहिले पथदर्शी प्रयोग आपल्या जिल्ह्यात करणारे राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आता राष्ट्रीय वृद्धापकाळ आरोग्य शुश्रूषा कार्यक्रमांतर्गत पहिले शुश्रुषा केंद्र चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 14 सप्टेंबरला मूल येथील आरोग्य उपकेंद्रात पूर्णतः वरिष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी समर्पित या केंद्राची सुरूवात होणार आहे. हा पथदर्शी प्रकल्प असून हळूहळू चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी हे केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग, चंद्रपूर जिल्हा प्रशासन, टाटा ट्रस्ट व जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठान या स्वयंसेवी संस्थेमार्फत हा प्रकल्प जिल्ह्यांमध्ये सुरू होत आहे. जनसेवा या स्वयंसेवी संस्थेने यासंदर्भात मूल येथे गेल्या चार महिन्यांपासून सर्वेक्षण केले आहे. तर टाटा ट्रस्टमार्फत भारतात अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याबाबत काळजी घेण्यासाठी राज्य सरकारसोबत राष्ट्रीय वृद्धापकाळ आरोग्य शुश्रूषा कार्यक्रम राबविला जात आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने चंद्रपूर जिल्ह्यातील या अभिनव प्रयोगासाठी एक सामंजस्य करार टाटा ट्रस्ट यांच्यासोबत केला आहे. या करारानुसार टाटा ट्रस्ट आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी संयुक्तरीत्या वरिष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी करणाऱ्या या प्रकल्पावर काम करायचे आहे.
या प्रकल्पामधील प्रशिक्षण, मनुष्यबळाची उपलब्धता, जनतेमध्ये जागरूकता निर्माण करणे, ज्येष्ठ नागरिकांची संख्या, त्यांना आवश्यक असलेल्या वैद्यकीय मदतीची विभागणी, त्यासंदर्भातील माहिती गोळा करणे यासाठी टाटा ट्रस्ट जनसेवा या संस्थेची मदत घेत आहे. या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी व वेळोवेळी आवश्यक मार्गदर्शन करण्यासाठी एका सुकाणू समितीची देखील स्थापना करण्यात आली आहे. त्यामध्ये अध्यक्ष म्हणून नागपूरचे उपसंचालक आरोग्य सेवा असतील, तर चंद्रपूरचे जिल्हा शल्यचिकित्सक हे सदस्य सचिव असतील. याशिवाय जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, अतिरिक्त संचालक आरोग्य सेवा व टाटा ट्रस्टने नियुक्त केलेले प्रतिनिधी या सुकाणू समितीमध्ये असतील. महिन्यातून एकदा या सुकाणू समितीची बैठक होणार आहे.
60 महिन्यासाठी हा करार करण्यात आला असून जिल्हास्तरावर जिल्हा शल्य चिकित्सक चंद्रपूर यांना नोडल ऑफिसर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिकांना उपचार केंद्रापर्यंत पोहोचवणे, त्यांच्या आरोग्याची तपासणी करणे शक्य नसेल, तर त्यांना आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचण्यास मदत करणे, त्यांना औषधोपचार देणे, आवश्यकतेनुसार फिजिओथेरपिस्टकडून सल्ला देणे, उतारवयात येणाऱ्या दृष्टिच्या आजारासाठी नेत्र तज्ञांची मदत करणे, ज्येष्ठ नागरिकांवर सुलभ उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षित करणे, जेस्ट नागरिक ज्यांच्या घरात आहे. अशा घरातील व्यक्तींना केसांची काळजी घेण्यासाठी मदत करणे सक्षम करणे, रुग्णांच्या प्रकृतीनुसार त्यांना जिल्हास्तरीय अथवा विभागस्तरीय अद्ययावत रुग्णालयात इलाजासाठी पाठविणे आदी उपक्रम या कार्यक्रमामध्ये राबविले जाणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हा पहिला प्रयोग आहे. मूल येथील जिल्हा आरोग्य उपकेंद्रांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सुविधा उपलब्ध केली जात आहे. सध्या अस्तित्वात असणाऱ्या यंत्रणेला बळकट सक्षम आणि आणखी लोकाभिमुख करून ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारा हा प्रकल्प मूल येथील पथदर्शी प्रकल्पाच्या यशस्वीतेवर जिल्हाभरात राबविण्यात येणार आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.