Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, सप्टेंबर १२, २०१८

गणेश विसर्जनासाठी यंत्रणा सज्ज ठेवा

उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांचे निर्देश 
 फुटाळा, अंबाझरी, सोनेगाव तलावांची केली पाहणी

नागपूर/प्रतीनीधी:
नागपुरातील गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक गणेशोत्सव म्हणून आदर्श ठरत आहे. तलावात गणेश विसर्जन करून जलप्रदूषण टाळण्यासाठी आता नागरिक स्वत: पुढाकार घेत आहेत. त्यामुळे घरगुती गणेश विसर्जनासाठी कृत्रिम टँक आणि सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावाचे काम पूर्ण करा, विसर्जनासाठी मनपाची संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवा, असे निर्देश उपमहापौर दीपराज पार्डीकर आणि स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले. 
श्री गणेश विसर्जनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी (ता. ११) उपमहापौर दीपराज पार्डीकर आणि स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी फुटाळा, अंबाझरी आणि सोनेगाव तलावांना भेट दिली. यावेळी त्यांच्यासह मनपाचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, मुख्य अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता गिरीश वासनिक, अनिरुद्ध चौगंजकर, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जैस्वाल, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, सहायक आयुक्त महेश मोरोणे, सहायक आयुक्त सुवर्णा दखने, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, उपअभियंता रवींद्र मुळे, झोनल आरोग्य अधिकारी डी.पी. टेंभेकर उपस्थित होते. 
तलावाच्या ठिकाणी मजबूत लोखंडी बॅरिकेटिंग करावी, विसर्जन परिसात हायमास्ट लाईट लावावेत, निर्माल्य कलश जागोजागी ठेवावे, विसर्जनसमयी येणाऱ्या भक्तांना लाऊडस्पीकरवरून सातत्याने सूचना देण्यात याव्या, तशी व्यवस्था सज्ज़ ठेवावी, फुटाळा तलाव परिसरात घरगुती गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची संख्या वाढविण्यात यावी, तलावावर लाईफ जॅकेट घालून जलतरणपटू, बोट व अग्निशमन विभागाचे जवान सज्ज ठेवावे, परिसरात वाहनांची गर्दी होऊ नये, वाहनांमुळे अडथळा निर्माण होऊ नये यासाठी तलाव परिसराच्या बाहेर पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी, पार्किंगच्या ठिकाणी ठळकपणे दिसणारे ‘पार्किंग’चे फलक लावावे, दहाही दिवस विसर्जन असते. त्यामुळे परिसराची दररोज स्वच्छता करण्यात यावी, सफाई कामगार सज्ज ठेवावे, अशी व्यवस्था प्रत्येक तलावावर करावी, एकंदरीतच संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवावी, असे निर्देश उपमहापौर दीपराज पार्डीकर आणि स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले. 
कृत्रिम तलावात गणेश विसर्जन करा
या दौऱ्यादरम्यान उपमहापौर दीपराज पार्डीकर आणि स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या दृष्टीने नागरिकांमध्ये अधिकाधिक जनजागृती करण्यात यावी, असेही म्हटले. नागपूर महानगरपालिका प्रशासन घरगुती गणेश मूर्तींच्या विसर्जनाकरिता संपूर्ण नागपूर शहरात ठिकठिकाणी कृत्रिम विसर्जन टँक ठेवत आहे. तलावांवरील गर्दी कमी करण्याच्या दृष्टीनेही हे पाऊल महत्त्वाचे आहे. त्यामुळे घरगुती गणेशाचे विसर्जन कृत्रिम टँकमध्येच करण्यात यावे आणि पाच फुटापर्यंतच्या गणेशाचे विसर्जन तलावठिकाणी तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावातच करण्यात यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.