Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, सप्टेंबर २३, २०१८

माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांचे निधन

पत्रकार ते केंद्रीय राज्यमंत्री पर्यंत केला प्रवास



अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चंद्रपुरात भरवण्यासाठी घेतला होता पुढाकार

चंद्रपूर : माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शांताराम पोटदुखे यांचं आज वृद्धापकाळानं निधन. ते 86 वर्षांचे होते. मागील 10 दिवसांपासून त्यांच्यावर नागपूरच्या अरनेजा हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते. पी व्ही नर्सिम्हा राव यांच्या मंत्रिमंडळात ते तत्कालीन अर्थमंत्रीे मनमोहन सिंग यांचे सहकारी होते. चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातून ते सलग चारदा निवडून आले. अजातशत्रू म्हणून त्यांची ओळख होती. साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील शैक्षणिक विकासात त्यांचं भरीव योगदान राहिलं. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या चंद्रपुरात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

विदर्भाच्या विकासासाठी
धडपडणारा नेता हरपला

मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

मुंबई, दि. २३ : माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री  शांताराम पोटदुखे यांच्या निधनाने विदर्भाच्या सर्वांगीण  विकासासाठी झटणारा एक महत्त्वाचा नेता आपण गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, श्री. पोटदुखे यांनी  सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळ व सरदार पटेल मेमोरियल ट्रस्टच्या माध्यमातून चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात अभियांत्रिकी, विज्ञान, कला, वाणिज्य, समाजकार्य, विधी महाविद्यालयांचे एक  मोठे शैक्षणिक जाळे विणले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दोन वेळा यशस्वी करण्यात त्यांचे मोठे योगदान होते. त्यासोबतच विदर्भातील विविध साहित्यविषयक  उपक्रमात त्यांचा सातत्याने पुढाकार होता. सक्रिय राजकारणापासून दूर झाल्यानंतरही ते समाजकारण, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात अखेरपर्यंत सक्रिय होते. त्यांच्या निधनाने विदर्भाच्या विकासासाठी प्रयत्नशील असणारा एक प्रमुख नेता आपण गमावला आहे.

शांतारामजी खरे चंद्रपूरभूषण - नानाभाऊ शामकुले, आमदार
 येथे पत्रकारितेला सुरुवात करून आपल्या राजकीय सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात जडणघडण करणारे शांतारामजी पोटदुखे हे चंद्रपूर भूषण होते. त्यांच्या जाण्याने जिल्ह्याच्या मोठी हानी झाली आहे, अशा शोकभावना चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार नानाभाऊ शामकुळे यांनी व्यक्त केल्या. ते म्हणाले शांतारामजींनी विकासकामे करताना कोणत्याही पक्षाला किंवा व्यक्तीला विरोध केला नाही. सर्व पक्षात त्यांचे मानाचे स्थान होते आणि जिल्ह्यासाठी ते सर्वात ज्येष्ठ नेते होते. चंद्रपूर येथे अखिल भारतीय साहित्य संमेलन  भरविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. सरदार पटेल महाविद्यालय, शांताराम पोटदुखे विधि महाविद्यालय, राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय याशिवाय अन्य शैक्षणिक संस्था त्यांनी सुरू करून चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यात उच्च शिक्षणाचे मार्ग सुरू करून दिले होते. ते अनेक सामाजिक कामाचे आणि सांस्कृतिक क्षेत्राला अर्थ पाठबळ देणारे दाते होते, असेही आपल्या शोकसंदेशात नानाभाऊ शामकुळे यांनी म्हटले आहे. 


शांतारामजी पोटदुखे यांच्या निधनाने
आम्ही अजातशत्रू व्यक्तीमत्व गमावले -

सुधीर मुनगंटीवार यांची शोक संवेदना

 चंद्रपूर दि 23 सप्टेंबर :माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री श्री शांतारामजी पोटदुखे यांच्या निधनाने आम्ही अजातशत्रू व्यक्तीमत्व गमावले असल्याची शोकसंवेदना राज्याचे वित्त,नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.
       शांतारामजींनी चंद्रपूर -गडचिरोली जिल्ह्याच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. हे जिल्हे शैक्षणिक दृष्ट्या संपन्न करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. माझे आणि शांतारामजींचे नाते राजकारणापलीकडचे होते . मी लोकसभेच्या दोन निवडणुका त्यांच्या विरोधात लढविल्या. त्यांच्याच सरदार पटेल महाविद्यालयाचा मी विद्यार्थी होतो. मात्र प्रचारादरम्यान त्यांनी नेहमीच माझे कौतुक केले. जेव्हाही मी नवी दिल्लीत गेलो तेव्हा त्यांनी मला कधीही इतरत्र थांबू दिले नाही .आपल्या निवासस्थानावावर थांबायला लावले , आपल्या गाडीतून मला संसद भवनात नेले. मी त्यांना नेहमी काका म्हणायचो , माझ्या वडिलांचे ते उत्तम मित्र होते. नेहमीच त्यांनी माझ्यावर मुलासारखे प्रेम केले. राजकीय मतभेदाच्या भिंती बाजूला सारून नेहमीच कौतुकाची आशीर्वादाची थाप त्यांनी कायम माझ्या पाठीवर ठेवली. त्यांच्या निधनाने राजकिय , सामाजिक , सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. परमेश्वर त्यांच्या पुण्यात्म्याला शांती प्रदान करो असेही त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.