Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जुलै २१, २०१८

महानिर्मितीचे कोराडी प्रशिक्षण केंद्र झाले डिजिटल

चित्रफितीचे विमोचन          ई-लर्निंग संकेतस्थळाचे उदघाटन            ई-लायब्ररी पोर्टल सुरु

प्रशिक्षणार्थीचे मूल्यमापन ऑनलाईन परीक्षेद्वारे 
कोराडी/प्रतिनिधी:
वीज उत्पादनाचे कार्य खडतर व जिकीरीचे असल्याने तरुण अभियंत्यांनी आपल्या पंच ज्ञानेंद्रियांचा सुयोग्य वापर करावा. यंत्रसामग्री व त्याची कार्यप्रणाली समजून घ्यावी,नवनवे तंत्रज्ञान अवगत करून घ्यावे, विश्लेषणात्मक दृष्टीकोन ठेवावा, प्रत्यक्ष साईटवर काम करावे, डिजिटल क्रांतीचे फायदे-तोटे व संरक्षण याबाबत सावधानता बाळगावी व परिश्रमाची सवय अंगीकारावी असे मोलाचे मार्गदर्शन महानिर्मितीचे संचालक(प्रकल्प) विकास जयदेव यांनी केले. 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यकारी संचालक(मानव संसाधन) विनोद बोंदरे तर प्रमुख अतिथी म्हणून संचालक(प्रकल्प) विकास जयदेव, विशेष अतिथी म्हणून कार्यकारी संचालक कैलाश चिरूटकर, राजू बुरडे, सतीश चवरे, मुख्य अभियंते सुनील आसमवार, अभय हरणे, अनंत देवतारे, पंकज सपाटे, राजेश पाटील व राजकुमार तासकर प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
प्रारंभी, कोराडी प्रशिक्षण केंद्राची चौफेर कामगिरी दर्शविणाऱ्या “ऊर्जा निकेतन” या चित्रफितीचे उदघाटन विकास जयदेव यांचे हस्ते करण्यात आले. कोराडी प्रशिक्षण केंद्राने मागील वर्षभरात डिजिटल स्वप्न उराशी बाळगले होते व त्यादृष्टीने टीम प्रशिक्षण केंद्र कोराडी यांच्या अथक परिश्रमातून डिजिटल स्वप्न साकार झाले त्यामध्ये प्रशिक्षणार्थीची मोबाईलवर प्रतिक्रिया घेणे, प्रशिक्षणार्थीचे ऑनलाइन परीक्षेद्वारे मूल्यमापन करणे, ई-लायब्ररी पोर्टल सुविधा, ई-लर्निंगच्या माध्यमातून महानिर्मितीच्या इतर विद्युत केंद्रांना तसेच प्रशिक्षण उप केंद्रांना व्हीडीओ कॉन्फरंसिंगद्वारे जोडण्यात आले. त्याची सुरुवात, चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील प्रशिक्षण उपकेंद्राशी प्रत्यक्ष व्हीडीओ कॉन्फरंसिंग करून झाली हे विशेष. डिजिटल क्रांतीसाठी कोराडी प्रशिक्षण केंद्राचे सहाय्यक अनुदेशक विपिन दुबे यांनी विशेष परिश्रम घेतले. लवकरच (इंटर अॅकटीव्ह ) ई-क्लास रूम सुविधा देखील सुरु करण्यात येणार आहे. याप्रसंगी, डॉ.अतुल बनसोड लिखित “टर्बाईन गव्हर्निंग सिस्टीम” या अनुभवसंपन्न पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ.अतुल बनसोड, मिलिंद रहाटगावकर व विपिन दुबे यांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित गौरव करण्यात आला. 
दैनंदिन कामकाजात नवीन अभियंत्यांनी सहभाग वाढवावा व यंत्राला समजून घेतले तर यशवी अभियंते व्हाल असे प्रतिपादन राजू बुरडे यांनी केले. सौर ऊर्जा क्षेत्रातील संचालन व सुव्यवस्था विषयक कामे महानिर्मितीच्या मनुष्यबळाने करावी याकरिता आवश्यक प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरु करण्याची विनंती सतीश चवरे यांनी व्यक्त केली. वीज उत्पादनाचे कार्य हे सांघिक स्वरूपाचे आहे व त्याचे उत्तम बीजारोपण कोराडी प्रशिक्षण केंद्र करीत असल्याचे गौरवोद्गार कैलाश चिरूटकर यांनी काढले. कोराडी प्रशिक्षण केंद्राला डिजिटल करण्याचे स्वप्न टीम प्रशिक्षण केंद्राचे होते व त्यादृष्टीने आज मैलाचा दगड गाठलेला असल्याचा सार्थ अभिमान सुनील आसमवार यांनी व्यक्त केला. कोराडी प्रशिक्षण केंद्रातर्फे मनुष्यबळाला आकार देण्याचे सर्वोत्तम कार्य सुरु असल्याचे विनोद बोंदरे यांनी अध्यक्षीय भाषणातून गुणगौरव केले. याप्रसंगी सुभाष कुटे या प्रशिक्षनार्थीने मनोगत व्यक्त केले. श्रीपाद पाठक यांच्या समर्पक सूत्रसंचालनाने कार्यक्रमाला अधिकच गोडवा आला. आनंद मेश्राम यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमाला महाव्यवस्थापक(वित्त व लेखा) तृप्ती मुधोळकर, अधीक्षक अभियंते तुकाराम हेडाऊ, जगदीश पवार, पांडुरंग अमिलकंठावार, विराज चौधरी, चंद्रदीपक डांगे, सहाय्यक महाव्यवस्थापक(मासं) प्रकाश प्रभावत,सुरक्षा अधिकारी सुधाकर इंगळे, कोराडी प्रशिक्षण केंद्राचे अधिकारी व कर्मचारीवृंद, के-८४ व ८५बॅचचे प्रशिक्षणार्थी, कोराडी व खापरखेडा प्रशिक्षण उप केंद्राचे अधिकारी आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. उदय मुठाळ यांच्या सुमधुर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.