येथील ठाकरे मार्केट भागातील न्यू इंग्लिश हायस्कूल मार्गावर सध्या रस्त्याच्या मधोमधपर्यंत दुचाकी वाहने उभी केली जात आहेत. यामुळे या मार्गावर नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. या मार्गाने प्रवास करणाऱ्यांकडून तेथील परिस्थिती बघता हा रस्ता की वाहनतळ असा प्रश्न पडत असून संभाव्य धोका टाळण्यासाठी संबंधितांनी योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.
शहरातील हृदयस्थान अशीच ठाकरे मार्केट परिसराची ओळख. याच परिसरात न्यू इंग्लिश हायस्कूल व न्युनिअर कॉलेज आहे. परंतु, सदर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मार्गावर सध्या रस्त्याच्या मधोमधपर्यंत दुचाकी वाहने उभी केली जात आहेत. ही वाहने रस्त्याच्या मधोमधपर्यंत उभी केली जात असल्याने या परिसरात बहूदा वाहतुकीची कोंडी होते. शिवाय शाळा याच मार्गावर असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
वाहतूक पोलिसांच्यावतीने बेशीस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते; पण या मार्गावर वाहतूक नियंमाना फाटा देत मनमर्जीने वाहने उभी केली जात असल्याने वाहतूक पोलिसांनी बेशिस्तांना शिस्त लावण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याची सुजान नागरिकांसह वाहनचालकांची मागणी आहे. अशीच परिस्थिती शहरातील बजाज चौक, आर्वी नाका, दादाजी धुनिवाले चौक आदी भागातही आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खासगी बसेस व वाहने वाहतूक कोंडीसाठी कारणीभूत ठरत आहे. याकडे संबंधीत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.