Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जुलै ३१, २०१८

मनपा शाळांमध्ये मिळणार ॲथलेटिक्स व बुद्धीबळाचे धडे

प्रतिभावंत खेळाडूंना खेळाच्या प्रवाहात आणण्यासाठी महापालिकेचा पुढाकार
नागपूर/प्रतिनिधी:
नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्यातील प्रतिभावंत खेळाडू पुढे येऊन शहाराचा नावलौकिक करावा, यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार मनपाच्या प्रत्येक शाळांमध्ये लवकरच ॲथलेटिक्स व बुद्धीबळ खेळाचे धडे दिले जाणार आहेत. यासाठी प्रत्येक शाळेत मानधन तत्त्वावर प्रशिक्षकांची नेमणूक करण्यात येणार असल्याचे मनपा क्रीडा समिती सभापती नागेश सहारे यांनी सांगितले. 
महानगरपालिकेच्या शाळांमध्ये क्रीडा विषयक वातावरण तयार करून प्रतिभावंत खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मनपा क्रीडा सभापती नागेश सहारे यांच्या अध्यक्षतेखाली मनपा शाळांमधील सर्व क्रीडा शिक्षकांची बैठक घेण्यात आली. यावेळी क्रीडा उपसभापती प्रमोद तभाने, सदस्य दर्शनी धवड, विरंका भिवगडे, संजय चावरे, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी आदी उपस्थित होते. 
यावेळी बोलताना श्री. सहारे म्हणाले, महानगरपालिकेच्या शाळांमध्ये अनेक प्रतिभावंत विद्यार्थी आहेत. मात्र त्यांना कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन मिळत नसल्याने ते पुढे येऊ शकत नाही. शिवाय काही मनपा शाळांमध्ये मैदानही उपलब्ध आहेत. मात्र देखरेखीअभावी त्यांचीही अवस्था वाईट आहे. या मैदानांना दुरूस्त करून येथे विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी जागा मिळवून देता येईल. महापालिकेच्या शाळांमध्ये क्रीडा विषयक रूची निर्माण करून विद्यार्थ्यांना खेळाच्या जवळ आणण्याचा मनपाचा मानस आहे. यासाठी इयत्ता चौथी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात येईल. यामध्ये सुरूवातीला ॲथलेटिक्सला प्राधान्य देण्यात येणार असून, ॲथलेटिक्समधील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात वर्गनिहाय विद्यार्थ्यांची तीन दिवस चाचणी घेण्यात येईल. यामधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष शिबिर घेण्यात येईल. प्रतिभावंत खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देऊन त्यांच्यातून पुढे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण करणे या मागील उद्देश आहे, असेही त्यांनी सांगितले. 
याशिवाय बुद्धीबळामध्ये मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी नावलौकिक करावा, यासाठी प्रत्येक शाळेमध्ये बुद्धीबळातील तज्ज्ञांकडून धडे देण्यात येतील. यासाठी मनपाकडून मानधन तत्त्वावर बुद्धीबळ तज्ज्ञांची नेमणूक करण्याचेही त्यांनी सुचविले. याशिवाय प्रत्येक मनपा शाळेत कार्यरत शारीरिक शिक्षकही प्रावीण्य असलेल्या खेळात विशेष मेहनत घेऊन खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचे त्यांनी सांगितले. मनपा शाळेतील प्रतिभावंत खेळाडूंच्या विकासासाठी सर्व बाबींमध्ये शारीरिक शिक्षकांना मदत करणार असल्याचे शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार यांनी सांगितले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.