Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जून ०५, २०१८

केंद्र शासनाच्या विविध योजनांचा ना.अहीर यांनी घेतला आढावा

उज्वला, अमृत, आवास, नदी खोलीकरणाचा आढावा
चंद्रपूर/प्रतिनिधी:
 केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्हयातील सर्वस्तरातील नागरिकांना योग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रत्येक योजनेचा आढावा सोमवारी केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहीर यांनी घेतला. यामध्ये प्रामुख्याने उज्वला गॅस वाटप योजना, प्रधानमंत्री आवास योजना, शुध्द पाणी पुरवठयाची अमृत योजना, महानगरातील पाणी पुरवठयासाठी नदी खोलीकरणाचा आढावा त्यांनी घेतला. चंद्रपूर शहरातील नागरिकांना उत्तम नागरी सुविधा मिळाव्यात, यासाठी यंत्रणा अधिक सक्रीय व योजनांची अंमलबजावणी गतिशील करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले. 
शासकीय विश्रामगृहावर झालेल्या दिवसभरांच्या बैठकांमध्ये त्यांनी सर्वप्रथम उज्वला गॅस योजनेचा आढावा घेतला. जिल्हयामध्ये या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या गतीने वाढावी, यासाठी असणा-या अडचणी त्यांनी समजून घेतल्या. तर विविध गॅस कंपन्या आणि त्यांच्यावर नियंत्रण असणा-या जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र मिस्कीन यांना आवश्यक सूचना केल्या. सामाजिक, आर्थिक सर्व्हेक्षणानुसार चंद्रपूर जिल्हयामध्ये 1 लाख 74 हजार पात्र कुटुंब आहेत. मात्र सद्या 57 हजार कुटुंबाना या योजनेचा लाभ मिळत आहे. या योजनेसाठी अंतोदयमध्ये येणारे कुटुंब, वनमजूर, अनुसूचित जाती, जमाती समुदायातील सर्व कुटुंब लाभार्थी ठरु शकतात. त्यामुळे या योजनेचा लाभ मोठया प्रमाणात जनतेपर्यंत पोहचावा, असे आवाहन यावेळी ना.अहीर यांनी केले. या बैठकीला महापौर अंजलीताई घोटेकर, प्रभारी जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, मनपा आयुक्त संजय काकडे उपस्थित होते.
त्यानंतर महानगरपालिका अधिका-यांसोबत त्यांनी बैठक घेऊन प्रधानमंत्री आवास योजना, अमृत योजना व पठानपुरा गेट बाहेरील नदीखोलीकरणाबाबतचा आढावा घेतला. चंद्रपूर शहरामध्ये अनेक झोपटपट्टयांच्या पुर्नविकास कार्यक्रम, आर्थिक दृष्टया दूर्बल घटक लाभार्थ्यांना वैयक्तिक स्वरुपात घरकुल बांधण्याचे अनुदान, खाजगी भागीदारीव्दारे घरांची निर्मिती करणे, कर्ज संलग्न व्याज अनुदान यांच्या माध्यमातून आर्थिकदृष्टया अल्प व दुर्बल घटकासाठी घराची निर्मिती करणे, या चार घटकांमध्ये नागरिकांना आवास सुविधा उपलब्ध करण्याबाबत अर्ज मागविले जात आहे. तथापि, महानगराची रचना आणि अनेक मजल्यांच्या इमारती ऐवजी स्वतंत्र घरकुलाकडे असणारा लोकांचा कल. यामुळे येणा-या अडचणी बाबत अधिका-यांनी चर्चा केली. तथापि, अनेक चांगल्या ठिकाणच्या जागांबाबतचे पर्याय यावेळी महानगरपालिका आयुक्त संजय काकडे व अधिका-यांनी ठेवले. यावेळी महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले यांनी देखील चर्चेमध्ये भाग घेतला व शहरातील विविध सिमावर्ती भागामध्ये अत्यंत गरजू लोकांसाठी उत्तम प्रतीची घरे उभारण्याबाबत सूचना केल्या. 
चंद्रपूर महानगराला पाणी पुरवठा करण्यासाठी अमृत योजनेअंतर्गत 231.77 कोटी रुपयांच्या योजनेला मंजूरी करण्यात आली आहे. इरई धरणातून होणा-या या पाणी पुरवठा योजनेबाबत सद्यास्थिती आढावा ना.अहीर यांनी घेतला. शहराच्या आजू बाजुला असणा-या नदीच्या पारंपारीक स्त्रोतातूनही अधिकाधिक पाणी उपसा करता येईल का याबाबतची चाचपणी करण्याचे निर्देश ना.अहीर यांनी दिले. शहरामध्ये शुध्द पाणी पुरवठयासाठी नेमक्या वस्त्या शोधून आरो मशीनचा प्रयोग सुरु करावा, अशा सूचना त्यांनी केल्या. याशिवाय शहराचे सौंदर्यीकरण, शहरातील वाहतूक व्यवस्था, पर्यायी रस्ते, अतिक्रमण, मंदिर परिसरातील फेरीवाल्यांची व्यवस्था आदी विषयांवर देखील चर्चा झाली. सोबतच महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणा-या आस्थापनेवरील कर्मचा-यांच्या समस्याही त्यांनी जाणून घेतल्या. पाणी पुरवठयाबाबत व उपलब्ध जलसाठयाबाबत योग्य प्रमाणात वितरण व्यवस्था हाताळण्याची सूचना त्यांनी केली. या बैठकीला राहूल शराफ व महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
फोटोवर क्लिक करा आणि जाहिरात बघा 



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.