चिमूर- उमरेड ते चिमूर- वरोरा या मुख्य रस्त्याच्या चौपदरीकरणाचे बांधकाम मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. यासाठी चिमूर- वरोरा मार्ग पूर्णत: खोदून ठेवण्यात आला. मात्र, पर्यायी रस्त्यावर माती टाकल्याने गिट्टी अस्ताव्यस्त झाली. या मार्गावरून वाहन चालविणे धोकादायक झाले आहे.
चिमूर विधानसभा क्षेत्र राष्ट्रीय महामार्गावर आले आहे. त्यामुळे चिमुरला जोडणाऱ्या उमरेड, वरोरा या राष्ट्रीय महामार्गाचे काम कंत्राटदाराकडून सुरू आहे. मात्र या रस्त्याचे काम सुरू असल्याने चिमूर वरोरा हा रस्ता खोदून ठेवला आहे. कंत्राटदाराने पर्यायी रस्ता तयार केला आहे. या पर्यायी रस्त्यावर माती व मुरूम टाकण्यात आले. अशातच पाऊस आल्याने या रस्त्यावर चिखल झाले. त्यावर उपाय म्हणून कंत्राटदाराने या रस्त्यावर गिट्टी टाकली आहे. मात्र त्यावर रोडरोलर फिरविला नाही. रस्त्यावरून वाहने जावून गिट्टी सर्वत्र विखुरली. वाहनधारकांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे.
उमरेड- चिमूर व वरोरा मार्गाचे चौपदरीकरण पूर्ण होण्यास आणखी बराच कालावधी लागणार आहे. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहने धावतात. पण, रस्ता योग्य नसल्याने प्रचंड त्रास होत आहे. पावसाळ्यात अनेक अडचणी येणार असून मोठा अपघात होवू शकतो. त्यामुळे पर्यायी मार्ग मजबूत करण्यासाठी संबंधित विभागाने तातडीने पुढाकार घ्यावा, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.
दुचाकी चालकांची कसरत रस्त्यावर माती व मुरूम टाकल्याने मोठ्या प्रमाणात घुळ पसरली आहे. त्यामुळे दुचाकीने प्रवास करताना वाहनधारकांचे हाल होतात. तोंडाला रूमाल नसल्यास चेहरा ओळखणे कठीण जाते. पाऊस आल्यानंतर चिखलात दुचाकी घसरते. दररोज या घटना घडत आहेत. मार्गावर गिट्टी टाकण्यात आली. पण ती धोेकादायक असल्याने दुचाकी कशी चालवायची, असा प्रश्न वाहनचालकांना अस्वस्थ करीत आहेत.
एकाच दिवशी तीन ट्रक उलटले.
चिमूर ते वरोरा मार्गावर जड वाहतुक सुरू असते. कोळसा, सिमेंट वाहतुक करणाºया वाहनांची संख्या सर्वाधिक आहे. रस्त्यावर माती टाकल्याने शेडगाव व बोथलीजवळ एकाच दिवशी तीन ट्रक उलटल्याची घटना घडली होती.