चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील देवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्भवती महिलेला योग्य उपचार न मिळाल्याने गर्भवती महिलेचा रूग्णालयातच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
सोनाली अर्जुन कुळसंगे (२१) रा. देवाडा असे मृत महिलेचे नाव आहे.सोनाली ही सात महिन्यांची गर्भवती होती.तिला रात्रीच्या सुमारास ताप व उलट्याचा त्रास सुरु झाला. त्यामुळे तिला रात्री १२ वाजता देवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिच्यावर साधारण उपचार करून दुर्लक्ष केले.प्रकृतीची साधी विचारपुसही केली नाही. त्यामुळे सोनालीची प्रकृती जास्तच खालावल्याने पहाटे ४ वाजताच्या सुमारास तिचा रूग्णालयातच मृत्यू झाला.
ही घटना माहित होताच सकाळी नागरिकांनीदवाखान्यावर हल्लाबोल केला.डॉक्टरांनी उपचार करण्यात हलगर्जीपणा केल्यामुळेच सोनालीचा मृत्यू झाला, असा आरोप नातेवाईक व गावकऱ्यांनी करीत रूग्णालयाच्या भोंगळ कारभाराविरूद्ध रूग्णालयात ठिय्या आंदोलन सुरू केले.याची माहिती रूग्णालय प्रशासनाने राजुरा पोलिसांना दिली. पोलिसांनी नातेवाईक व गावकऱ्यांची समजूत काढत घटनेला जबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल,असे आश्वासन दिले. व नातेवाईक परतले.