Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मे २३, २०१८

नक्षलग्रस्‍त भागात मोबाईल टॉवरची क्षमतावाढ करा

  • विदर्भ-तेलंगणा सीमेवर होणारी पशुधन तस्‍करी रोखण्‍यासाठी 
  • केंद्रीय गृहराज्‍यमंत्री श्री. हंसराज अहीर यांची पोलिस विभागासोबत आढावा बैठक 



नागपूर, दिनांक 23 मे 2018
विदर्भामधील चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली या जिल्‍हयांना लागून असणा-या तेलंगाणा राज्‍याच्‍या सीमेमधून मोठया प्रमाणात गोवंशतस्‍करी होत असून, ती रोखण्‍यासाठी नागपूर व अमरावती विभागाच्‍या पोलिस महानिरिक्षक व संबंधित विभागातील पोलिस अधिक्षकांची बैठक घेऊन त्‍यांना कडक कार्यवाही करण्‍याचे निर्देश आपण दिले असल्‍याचे केंद्रीय गृहराज्यमंत्री श्री. हंसराज अहीर यांनी आज नागपूर येथे सांगितले. स्‍थानिक रवी भवनमध्‍ये महाराष्‍ट्रातील पशुतस्‍करी रोखण्‍यासंदर्भात कार्यवाहीची आढावा बैठक व गडचिरोलीच्‍या नक्षलग्रस्‍त भागात मोबाईल नेटवर्कसंबंधीची आढावा बैठक घेतल्‍यानंतर प्रसारमाध्‍यमांच्‍या प्रतिनिधीशी संवाद साधतांना ते बोलत होते. या आढावा बैठकीदरम्‍यान गडचिरोलीचे खासदार श्री. अशोक नेते, नागपूरचे पोलिस आयुक्‍त डॉ. व्‍यंकटेशम्, नक्षलविरोधी अभियान विभागाचे पोलिस महानिरिक्षक श्री. शरद शेलार, सी.आर.पी.एफ. चे उप महानिरिक्षक श्री. शेखर, बी.एस.एन.एल. च्‍या मोबाईल नेटवर्किंग विभागाच्‍या महाव्‍यवस्‍थापिका श्रीमती नम्रता तिवारी, नागपूर सहपोलीस आयुक्त श्री. शिवाजी बोडखे, नागपूर ग्रामीण विभागाचे पोलिस अधिक्षक श्री. शैलेश बलकवडे तसेच नागपूर परिमंडळातील पोलिस उपआयुक्‍त व सबंधित जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक व आर्णीचे आमदार श्री. राजु तोडसाम उपस्थित होते.




तेलंगाणामध्‍ये विदर्भ, पश्चिम महाराष्‍ट्र, मध्‍यप्रदेश तसेच खान्देश मधून होणारी पशुधन तस्‍करी रोखण्‍यासाठी पोलिस विभागाला स्‍थानिक वाहतूक विभागाकडून मदत मिळावी, यासाठी आपण सूचना दिल्‍या आहेत. गडचिरोली मधील नक्षलग्रस्‍त भागात मोबाईल नेटवर्कच्‍या क्षमता वाढीसाठी त्‍याचे 4 जी तंत्रज्ञानामध्‍ये अद्यावतीकरण, टॉवर्सची उंची वाढवणे इत्‍यादी संदर्भात आपण बी.एस.एन.एल.च्‍या अधिका-यांना निर्देश दिले आहेत. गडचिरोलीच्या ज्‍या क्षेत्रामध्‍ये टॉवर्स लावण्‍यासाठी अडचणी येत होत्‍या त्‍यादेखील पोलिस यंत्रणेने दूर केल्‍या आहेत. त्यामुळे या परिसरात राहणा-या पोलिस जवान, केंद्रीय राखीव पोलिस दलाचे जवान यांना चांगली मोबाईल नेटवर्कची सुविधा यामुळे उपलब्‍ध होईल, अशी माहिती श्री. अहीर यांनी यावेळी दिली.




आढावा बैठकीमध्‍ये नागपूर- अमरावती विभागातील वरिष्‍ठ पोलिस अधिकारी, बी.एस.एन.एल.चे वरिष्‍ठ अधिकारी उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.