महानिर्मितीचा स्तुत्य उपक्रम
मुलींना शारीरिक वाढ, पाळी व अनुषंगिक ज्ञान हे सहसा आईकडून मिळते किंवा अर्धवट ज्ञान मैत्रिणी किंवा वेग
वेगळ्या माध्यमांतून मिळते. अनेकवेळा गैरसमजातून दुष्परिणामाचे प्रसंग व पर्यायाने आरोग्यविषयक तक्रारी देखील उद्भवतात त्यामुळे प्रत्येक मुलीला याबाबत वैद्यकीय ज्ञान असणे गरजेचे असल्याचे मत डॉ. माया ब्राम्हणे यांनी व्यक्त केले. कोराडी वीज केंद्राच्या विद्युत विहार वसाहतीतील क्लब नंबर एक येथे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित ‘कळी उमलताना’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
मंचावर स्त्रीरोग तज्ञ डॉ.माया ब्राम्हणे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक संगीता बोधलकर, अधीक्षक अभियंते श्याम राठोड, संजय रहाटे, प्रागतिक विद्यालयाचे मुख्याद्यापक शेंडवारे विशेषत्वाने उपस्थित होते. अध्यक्षस्थान मुख्य अभियंता अभय हरणे यांनी भूषविले.
याप्रसंगी डॉ. माया ब्राम्हणे म्हणाल्या कि, मुलींच्या शरीराची अंतर्गत रचना, वयात येताना शरीरात होणारे बदल, पाळीच्या संबंधातील सर्व प्रकारचे त्रास,स्वभाव व आवाजातील बदल,विकार, सॅनेटरी नॅपकीनची माहिती-वापर, स्वच्छता, पोषक आहार, प्रसूती, वयोपरत्वे येणारे आरोग्यविषयक प्रश्न याबाबत प्रत्येक मुलीला माहिती असणे गरजेचे आहे. डॉ.ब्राम्हणे यांनी याप्रसंगी उपस्थित मुलींशी खाजगी आरोग्यविषयक चर्चा केली. विशेष म्हणजे मुलींनी देखील मनमोकळेपणाने प्रश्न विचारून शास्त्रीय माहिती जाणून घेतली व गैरसमज दूर करून घेतले. वयात येणाऱ्या प्रत्येक मुलीला शारीरिक वाढ, होणारे बदल, लैंगिक शिक्षण याची वैद्यकीय माहिती देण्यासाठी महानिर्मितीच्या कोराडी औष्णिक विद्युत केंद्राने सामाजिक बांधिलकीच्या नात्याने खास स्त्री रोगतज्ञ डॉ. माया ब्राम्हणे यांना बोलविण्यात आले होते. कोराडी येथील प्रागतिक विद्यालय व विद्यामंदिर शाळेच्या सातवी ते नववीच्या सुमारे ३०० विद्यार्थिनींनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.
अध्यक्षीय भाषणातून अभय हरणे म्हणाले कि, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच विकासात्मक उपक्रम घेऊन येथील रहिवाश्यांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी कोराडी वीज केंद्र सातत्याने प्रयत्नशील आहे व त्यासाठी महानिर्मिती कटिबद्ध आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्या सोरते यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्कृती राहाटे,अरुणा भेंडेकर,सीमा शंखपाळे, प्रांजली कुबडे, विद्या मंदिर व प्रागतिक विद्यालयाचे महिला कर्मचारीवृंद, कल्याण अधिकारी प्रसाद निकम, प्रवीण बुटे, समाधान पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.