चंद्रपूर/प्रतिनिधी:
जिल्हा सामान्य रूग्णालयातील कंत्राटी कामगारांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी ८ जानेवारीपासून जटपुरा गेटवर बेमुदत उपोषण सुरू आहे. या उपोषणाचे पडसाद मंत्रालयात पोहचले असून राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत मंगळवारी तातडीचे बैठक घेतल्याची माहिती आहे.
कामावरून कमी करण्यात आलेल्या १३७ कामगारांना पूर्ववत कामावर घेण्याच्या मागणीसाठी प्रहारचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक पप्पू देशमुख यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे़ दरम्यान सर्वच महिला-पुरूष कामगारांनी सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरू करून आंदोलन तीव्र केले आहे़ सदर आंदोलनाला मंगळवारी विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी भेट देवून आपला सक्रिय पाठिंबा दर्शविला़ यामध्ये राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा बेबीताई उईके, महानगर अध्यक्ष ज्योती रंगारी, शोभा घरडे, सरस्वती गावंडे, राष्ट्रवादीचे डी. के़ आरीकर व नगरसेवक दीपक जयस्वाल, तसेच सामाजिक कार्यकर्त्या रत्नमाला बावणे, पौर्णिमा बावणे, काँग्रेसच्या नगरसेविका विना अभय खनके, सकीना रशिद अंसारी, संगिता भोयर, महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस रमेश पिंपळशेंडे, रिपब्लिकन नगरविकास फ्रंटचे प्रविण उर्फ बाळू खोब्रागडे, प्रतिक डोर्लीकर, राष्ट्रीय मुस्लिम हक्क संघर्ष समितीचे हाजी अनवर अली, मुस्ताक कुरेशी, शिवसेनेचे इरफान षेख, सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेटंचे मुख्य संघटक बळीराज धोटे, राष्ट्रवादी किसान सभा जिल्हाध्यक्ष सुरेश रामगुंडे, विनोद दत्तात्रय, राष्ट्रीय जनरल मजदूर युनियन (इंटक)चे जागेश सोनुले, राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ सचिव संजय कन्नावार, माजी नगरसेवक संतोष लहामगे, राजेश अड्डूर आदींचा समावेश होता.
दरम्यान, या मुद्यावर चर्चा करण्यासाठी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रालयात तातडीची बैठक घेतली. या बैठकीत काय निर्णय झाला, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे़