चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर जिल्हा ‘स्मार्ट’ होण्याकडे वाटचाल करीत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून यात आणखी भर पडणार आहे. चंद्रपूरसह बल्लारपूर, मूल आणि पोंभुर्णा ही शहरे लवकरच वायफाययुक्त होणार आहे. यासाठी जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा अभ्यास करून तीन आठवड्यात यासंबंधीचा प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत.
मुंबईत शनिवारी सिस्कोच्या वतीने यासंबंधीचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. वन विभागाचे सचिव विकास खारगे यांच्यासह सिस्कोचे वरिष्ठ अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. जगभरातील बेस्ट प्रॅक्टीसेसचा अभ्यास करून या माध्यमातून कोणत्या सेवा नागरिकांना देता येतील, यासाठी किती खर्च येईल, याची माहिती देणारा प्रस्ताव सादर करावा, अशा सूचनाही यावेळी ना. मुनगंटीवार यांनी दिल्या. कौशल्य विकास, ई-मेडीसीन, ई-लर्निंग, जनजागृतीचे कार्यक्रम, वनउपजावर प्रक्रिया करून करता येणाऱ्या गोष्टी, यासंबंधीचे विश्वातील ज्ञान या सेवेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवता आले पाहिजे. कौशल्य विकास, मुद्रा बँक व रोजगार संधीच्या विकासासाठी या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अतिशय प्रभावीपणे वापर करून घेता आला पाहिजे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांना याचा लाभ देऊन कौशल्य विकासाच्या संधींचा विस्तार करता आला पाहिजे. याचा विचार करून युनिक मॉडेलची यासाठी निवड करावी. सर्वसामान्य माणसांच्या हातातील स्मार्ट फोन हाच या माध्यमातून सुसंवादाचा आणि विकासाचा दुवा झाला पाहिजे, अशी अपेक्षाही ना. मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केली.