चंद्रपूर/प्रतिनिधी:
यावर्षीचा कर्मयोगी बाबा आमटे मानवता पुरस्कार मतीन भोसले यांना तर साधनाताई आमटे समीधा पुरस्कार हा शुभदा देशमुख यांना बहाल करण्यात आला. आनंदवन चौकातील ज्ञानदा जीवन विकास केंद्र परिसरात रविवारी आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानदा वसतिगृहाचे माजी विद्यार्थी तथा लाईफ लाईन ब्लड बँक नागपूरचे संचालक डॉ. हरीश वरभे होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार देवेंद्र गावंडे, प्रयास सेवांकूर संस्था अमरावतीचे संस्थापक डॉ.अविनाश सावजी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कर्मयोगी बाबा आमटे मानवता पुरस्कार गोवा स्वातंत्र संग्राम सैनिक श्रीधर पद्मावार प्रायोजित असून यामध्ये ५१ हजार रुपये रोख, मानपत्र असलेला पुरस्कार यावर्षी अमरावती जिल्ह्यातील मंगरुळ चव्हाण गावात पारधी समाजातील मुलांकरिता आश्रमशाळा काढून शाळेची यशस्वी वाटचाल करणारे मतीन भोसले यांना प्रदान करण्यात आला.
याचवेळी साधनाताई आमटे समीधा पुरस्कार गडचिरोली जिल्ह्यातील कुरेखडा येथील ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ संस्थेच्या सहसंस्थापिका शुभदा देशमुख यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप ५१ हजार रुपये रोख व मानपत्र होते. याप्रसंगी प्रा. म. घो. उपलेंचवार लिखित मानपत्राचे वाचन ज्ञानदा वसतिगृहाचे माजी विद्यार्थी प्राचार्य गजानन लोनबले यांनी केले. पाहुण्यांचा परिचय व प्रास्ताविक माजी विद्यार्थी दिलीप अग्रवाल यांनी केले. संचालन शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश महाकाळकर यांनी तर उपस्थितांचे आभार डॉ. श्रीराम महाकरकर यांनी मानले. सुचेता पद्मावार यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. साधनाताई आमटे समीधा पुरस्कार भारत जोडोचे गिरीष पद्मावार यांनी प्रायोजित केला.