चंद्रपूर(ललित लांजेवार):
वाहतूक पोलीस हा कायमचा साऱ्यांच्या टिकेचा धनी. त्याने शिस्त दाखवली तरी त्याच्यावर टीका आणि त्याने कोणावर कारवाई न करता सोडून दिले तरी त्याने चिरीमिरी घेतल्याची टीका. पण वाहतूक पोलीसही माणसेच असतात आणि अनेक प्रसंगात त्यांची माणुसकी, त्यांचा प्रामाणिकपणा त्यांच्या कार्यातून दिसुन येतो.
चंद्रपूर वाहतूक शाखेचे पोलीस बन्सी कुडावले यांनीही अश्याच एका प्रसंगातून पोलिसांचे कर्तव्य व जबाबदारीचे ताजे उदाहरण दाखवून दिले आहे. त्यामुळे यांच्या या कार्याने पोलीस खात्याची प्रतिमा चांगलीच उंचावली आहे.
मंगळवारी सोशल मीडियावर बन्सी कुडावले यांचे २ फोटो पोलीस खात्यातील किसान राठोड यांच्या फेसबुक अकाउंट वरून शेअर करण्यात आले आहे, फोटोत चंद्रपूर शहरातील अतिशय वर्दळीचा भाग असलेल्या बंगाली कॅम्प चौकातील हे फोटो असून यात कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस बंसी कुडावले यांनी आपल्या कर्तव्य पार पाळत माणुसकी दाखवत एका ८० वर्षीय वृद्ध महिलेला हात पकडून मार्ग ओलांडण्यास मदत केली. तर सोबतच दुसऱ्या फोटोत शाळेतून घरी जात असलेल्या शालेय विद्यार्थ्यांचा हात पकडून मार्ग ओलांडण्यास मदत केली, बंगाली कॅम्प परिसर हा चंद्रपूर शहरातील अत्यंत वर्दळीचा मार्ग म्हणून ओळखला जातो, या सिग्नलवर दिवसातून जळपास १२ तास मार्ग सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांची आवश्यकता असते, हाच मार्ग चंद्रपूर जिल्ह्यातून चौफेर जातो. त्यामुळे पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संपत चव्हाण यांनी वर्दळीच्या प्रत्येक ठिकाणी किमान २ वाहतूक पोलिसांची नियुक्ती केली आहे.हल्ली वाहतूक सुरळीत करण्यासोबतच मोकाट जनावरे, फुटपाथवरील अतिक्रमण हटविणे, बंदोबस्त या सारख्या अनेक बाबी हाताळाव्या लागतात,अश्यातच पोलीस हा देखील एक माणूसच असून त्याने स्वतःसाठी जगता जगता दुसऱ्यांसाठी देखील जगण्याचा हा संदेश ईतर पोलिसांना दिला आहे.
आपले कर्तव्य सर्वसामान्याचे रक्षण आणि सेवा करण्याचे ध्येय लक्षात ठेऊन आज या वाहतूक नियंत्रण पोलीस कर्मचाऱ्याने माणुसकी जपली. यावरून माणसाने माणसासारखे जगावे असा संदेश यातून पुढे येतो. अश्याच प्रकारे सर्व कर्मचाऱ्यांनी माणुसकी जपली तर समाजामध्ये पोलिसांची असलेली धडकी कमी होईल आणि माणुसकी सदैव टिकून राहील,सध्या रेझिंग डे निमित्त पोलीस अनेक उपक्रम करतात. याचवेळी हा अनोखा उपक्रम घडला आणि पोलिसांची मान उंचावली आहे .