Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, जानेवारी १०, २०१८

15 जानेवारीपासून चांदा क्लबवर जिल्हा कृषी महोत्सव

चंद्रपूर/प्रतिनिधी:                                                 

                                        15 ते 19 जानेवारी 2018 या कालावधीत चांदा क्लब ग्राऊंड, चंद्रपूर येथे जिल्हा कृषि महोत्सव, सेंद्रिय शेतमाल विक्री व महिला बचत गट मेळावा आयोजित करण्यात येत आहे. सदर कार्यक्रमाचे उदघाटन वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा पालकमंत्री मा.सुधीर मुनगंटीवार यांचे शुभहस्ते तर केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहिर यांचे अध्यक्षतेखाली व सर्व मान्यवरांचे उपस्थित होणार आहे. या कृषी महोत्सवाचा कृषी क्षेत्रातील ज्ञानार्जण, विक्री, खरेदीसाठी लाभ घ्यावा असे आवाहन कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा चंद्रपूर यांनी केले आहे.

                                                या कार्यक्रमामध्ये शेतक-यांना शेडनेट, मूलस्थानी जलसंधारण, मागेल त्याला शेततळे, जलयुक्त शिवार, यांत्रिकीकरण व इतर अनेक योजनांबाबत प्रात्यक्षिक, ट्रॅक्टर व विविध यंत्र (ट्रॅक्टर व बैलचलित), फळ प्रक्रिया पदार्थ, फळ व भाजीपाला प्रक्रियेचे यंत्र, जिल्हा परिषदेच्या विविध योजनांची माहिती, पशुसंवर्धन विभागाच्या योजनांची माहिती देण्यात येईल. तसेच हायड्रोपोनिक्स चा-यांचे प्रात्यक्षिक, मलबेरी व टसर रेशिम प्रात्यक्षिक व माहिती, मत्स्यपालन, मधमाशी पालन प्रात्यक्षिक, ठिंबक व तुषार सिंचन प्रात्यक्षिक यासारखे विविध शेतकरी उपयोगी माहिती देणारे स्टॉल प्रदर्शनीमध्ये उपलब्ध राहतील.
                                              सेंद्रिय शेती योजनेंतर्गत तयार झालेले धान्य व बिगर सेंद्रिय शेतीमधील धान्य सुध्दा शेतकरी बांधव विक्रीसाठी ठेवणार आहेत. ज्यांचा लाभ थेट शेतकरी ते ग्राहक संकल्पनेनुसार नागरिकांपर्यंत पोहचवावयाचा आहे. तसेच महिला बचत गटांमार्फत अंगिकृत विविध उपक्रम व साहित्य सुध्दा प्रदर्शित केल्या जाणार आहे.धान्य, शेतमाल विक्रीसाठी, ठेवण्यास उत्सुक शेतकरी यांनी 07172-270163 या क्रमांकावर दूरध्वनीव्दारे किंवा ई-मेल, वैयक्तिकरित्या नोंदणी करणे आवश्यक राहील. 

                                               नोंदणी करुन प्रदर्शनीत धान्य, शेतमाल विक्रीसाठी व प्रदर्शित करावयाचे नमून्याबाबत संबंधिताचे नाव, मोबाईल नंबर, पत्ता, धान्यबाबत माहिती नमूद करावी लागेल. नोंदणी झालेल्या शेतक-यांनी त्यांनी नोंदविल्याप्रमाणे शेतमाल, धान्य व प्रदर्शनीचे नमुने 14 जानेवारी 2018 रोजी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत प्रदर्शनसळी उपलब्ध करावे.
                                                          स्वयंसहाय्यता समुहाच्या माध्यमातून हा उपक्रम बाजारपेठ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने केंद्र व राज्य सरकारव्दारा आयोजित केला जातो. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत महिला स्वयंसहाय्यता समुहामार्फत उत्पादीत वस्तुंचे प्रदर्शन व विक्रीचे आयोजन म्हणजे ग्रामीण भागातील महिलांच्या अंगी असलेल्या गुणकौशल्याचे प्रदर्शन व स्वत:मध्ये असलेला आत्मविश्वास वाढविण्यासाठी महत्वूपर्ण उपक्रम आहे. सदर वस्तु उत्पादनाच्या संबंधाने महिलांचे विविध स्तरावर प्रशिक्षण आयोजित होत असल्यामुळे महिलांमध्ये संबंधीत व्यवसायिक कलागुणांना वाव मिळते व कौशल्य वृध्दिंगत होते ही महत्वपूर्ण बाब आहे.

          या प्रदर्शनीमध्ये जिल्हयातील एकूण शंभर महिला बचत गट सहभागी होत आहे. या प्रदर्शनीमध्ये सहभागी गटांच्या माध्यमातून बाजाराच्या मागणीनुसार विविध गृहोपयोगी उत्पादने विक्रीस उपलब्ध राहणार आहेत. यामध्ये लोणचे, धने, शेवया, चटनी, रेडीमेड कपडे, खादीचे कपडे, कडधान्य, मसाल्याचे पदार्थ, खाद्यपदार्थ, लांब पोळी, पुरण पोळी, झुनका भाकर, मोहाची भाकर, जवस चटण्या, मातीचे भांडे, लोकरी वस्तू, टेबल क्लॉथ, मेंढीच्या केसापासून बनलेल्या गादया, उशा, घोंगडी, लाकडी शिल्प, टोपल्या, सुप-परडे, खराटा, झाडू, कंदील, शोपीस, हातसळीचे तांदुळ, सुहासीक तांदुळ, कापडी बॅग, मशरुम, टेराकोटा, गांडूळ खत, गोमुत्र अर्क, आयुर्वेदिक उत्पादने, तुरदाळ, उडीद, चणा, मुग, मटकी, चवळी इत्यादी ग्रामीण भागातील कडधान्ये विक्रीला उपलब्ध होणार आहेत.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.