चंद्रपूर/ प्रतीनिधी :
कोरपना तालुक्यातील बिबी येथील प्रतिथयश कवी अविनाश पोईनकर यांच्या 'उजेड मागणारी आसवे' या काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय रसिकराज उत्कृष्ठ वाड:मय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. नागपूर येथे आयोजित कार्यक्रमात कृषी विद्यापिठाचे माजी कुलगुरु डॉ. शरद निंबाळकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देवून सन्मान करण्यात आला. यावेळी संस्कृत विद्यापिठाचे कुलगुरु डॉ.पंकज चांदे, संत साहित्याचे अभ्यासक डॉ.सुधाकर मोगलेवार, डॉ.बळवंत भोयर, आचार्य ना.गो.थुटे, मेजर हेमंत धकाते उपस्थित होते. अविनाश पोईनकर यांचा 'उजेड मागणारी आसवे' हा कवितासंग्रह महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अनुदानातून प्रकाशित झाला आहे. प्रसिद्ध साहित्यिक व समिक्षक डॉ.किशोर सानप यांची प्रस्तावना व पहिले युवा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते ऐश्वर्य पाटेकर यांचे ब्लर्ब या कवितासंग्रहाला आहे. राज्यस्तरीय वाड:मय पुरस्कार मिळाल्याबद्दल अविनाश पोईनकर यांचे अक्षर साहित्य कला मंच व मित्रमंडळींनी अभिनंदन केले आहे.