नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील अधिकारी विकासाकडे लक्ष देण्याऐवजी स्वत:हूनच वाद उकरून काढण्यावर बहुदा जास्त भर देत आहेत. दीक्षांत समारंभात विनानिमंत्रण जेवायला आलेल्या प्राध्यापकांना नोटीस देण्यासंदर्भातील वाद ताजाच असताना एका ‘व्हॉट्सअॅप ग्रुप’मुळे विद्यापीठातील अधिकारी अस्वस्थ झाले आहेत. संबंधित ‘ग्रुप’च्या नावात ‘आरटीएमएनयू’ वापरण्यास विद्यापीठ प्रशासनाने हरकत घेतली असून चक्क ‘व्हॉट्सअॅप अॅडमिन’ला कायदेशीर नोटीसदेखील बजावली आहे. या प्रकाराबाबत विद्यापीठ वर्तुळातून आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून प्रशासनाला झाले तरी काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य महेंद्र निंबर्ते यांनी ‘आरटीएमएनयू-ए’ या नावाचा ‘व्हॉट्सअॅप ग्रुप’ तयार केला आहे. या ‘ग्रुप’चे ‘आयकॉन’ म्हणून नागपूर विद्यापीठाच्या इमारतीचे चित्र लावले होते. यात शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक, अधिकारी तसेच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. विद्यापीठासह समाजातील विविध घडामोडींवर येथे मतमतांतरे व्यक्त करण्यात येतात.
मात्र तीन दिवसांअगोदर महेंद्र निंबर्ते यांना धक्काच बसला. त्यांच्या भंडारा येथील निवासस्थानी कायदेशीर नोटिशीचे पत्र आले. विद्यापीठाच्या वतीने अॅड.महेंद्र लिमये यांनी ही नोटीस पाठविली होती. आमचे पक्षकार विदर्भातील नामांकित विद्यापीठ असून याला ‘आरटीएमएनयू’ (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी) असे ओळखल्या जाते. मात्र याच नावाचा उपयोग करून तयार झालेल्या ‘व्हॉट्सअॅप ग्रुप’मुळे संभ्रम निर्माण झाला असून हा विद्यापीठाचा अधिकृत ‘ग्रुप’ आहे की काय, अशी शंका अनेक सदस्यांच्या मनात उपस्थित होत आहे. त्यामुळे या ‘ग्रुप’चे नाव बदलण्यात यावे व विद्यापीठाचे छायाचित्रदेखील तीन दिवसांत हटवावे, असे नोटिसीच्या माध्यमातून बजाविण्यात आले. अशाप्रकारे ‘व्हॉट्सअॅप अॅडमिन’ला विद्यापीठाने नोटीस देण्याची ही पहिलीच घटना आहे. या मुद्यावरून विद्यापीठ वर्तुळातदेखील खळबळ उडाली असून अनेकांनी विद्यापीठाच्या या पावलावर टीका केली आहे.