नागपूर : मुंबई-नागपुर दुरांतो एक्स्प्रेसने सोने-चांदी आणि हिऱ्याचे ८० लाख २७ हजार ७७० रुपये किमतीच्या दागिन्यांची २९ पाकिटे आणणाऱ्या आरोपीला रेल्वे सुरक्षा दलाच्या गुन्हे शाखेने गुरुवारी सकाळी नागपूर रेल्वेस्थानकावर अटक केली. दरम्यान एका कुरिअर कंपनीच्या आड हे दागिने आणल्याची माहिती आरोपीने दिली असून, दागिन्यांसह आरोपीला आयकर विभागाच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
रेल्वे सुरक्षा दलाच्या गुन्हे शाखेला रेल्वेगाडी क्रमांक १२२८९ मुंबई-नागपुर दुरांतो एक्स्प्रेसमध्ये श्याम बंकुवाले नावाचा व्यक्ती सोन्याची पाकिटे आणणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. गुन्हे शाखेने ही माहिती कसारा येथील आरपीएफला दिली. त्यानुसार कसारा येथील आरपीएफ जवान संजय पाटील आणि इगतपुरी येथील आरपीएफचा जवान सज्जन गोरे हे दुरांतो एक्स्प्रेसमध्ये चढले. त्यांनी आरक्षणाच्या यादीतून श्याम हे नाव शोधून काढले असता आरोपी एस-७, बर्थ ४९ वर प्रवास करीत असल्याचे आढळले. त्यांनी आरोपीवर नागपुरात येईपर्यंत पाळत ठेवली. नागपुरात दुरांतो एक्स्प्रेस सकाळी ९.१५ वाजता नागपूर रेल्वेस्थानकावर आल्यानंतर आरपीएफचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक भगवान इप्पर, आरपीएफ ठाण्याचे निरीक्षक वीरेंद्र वानखेडे, संजय पुरकाम, विजय पाटील, दीपक वानखेडे, किशोर चौधरी, नीळकंठ गोरे यांनी आरोपीला सोन्याच्या २९ पाकिटांसह अटक केली. आरोपीने आपले नाव श्याम बंकुवाल (३८) रा. अकोला असे सांगून आपण इंद्रायणी कुरियर अँड लॉजिस्टिक सर्व्हिससाठी काम करीत असल्याचे सांगितले. या कामासाठी आठ हजार रुपये वेतन आणि प्रत्येक फेरीमागे ७०० रुपये मिळत असल्याची माहिती त्याने दिली. आरपीएफने आयकर विभागाचे अधिकारी आणि सोन्याचे मूल्यमापन करणाऱ्या तज्ज्ञांना बोलावले. यात २ किलो ३०९ ग्रॅम सोन्याचे दागिने, २९.७४ कॅरेट हिºयाचे दागिने एकूण किंमत ७८ लाख ७६ हजार २०३ रुपये आणि चांदीचे ३ किलो ६०१ ग्रॅम चांदीचे दागिने किंमत १ लाख ५१ हजार ५६७ यांचा समावेश होता. मूल्यमापन केल्यानंतर जप्त केलेले दागिने आरोपीसह आयकर विभागाच्या स्वाधीन करण्यात आले.