Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, डिसेंबर १०, २०१७

‘हल्लाबोल’वाल्यांच्या ‘डल्लामार’ यात्रेचे पुरावे देऊ

नागपूर : एकीकडे विरोधी पक्षांनी ‘हल्लाबोल’ यात्रेच्या माध्यमातून सरकारविरोधात पवित्रा घेतला असताना सत्ताधारीदेखील त्याच आक्रमकतेने प्रत्युत्तर देण्यास सज्ज झाले आहे. ‘हल्लाबोल’वाल्यांच्या ‘डल्लामार’ यात्रेचे पुरावे सभागृहासमोर मांडण्यात येतील. शेतकºयांच्या स्थितीला कॉंग्रेस-राष्ट्रवादीच कसे जबाबदार आहे हे पुराव्यांसह सादर करू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सोमवारपासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार असल्याचे संकेतच यातून मिळाले आहेत.
विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आघाडीच्या १५ वर्षांच्या कार्यकाळातील कामे आणि आम्ही ३ वर्षांत केलेली कामे यांचा लेखाजोखाच सभागृहात मांडू. विरोधकांकडून कर्जमाफी तसेच शिष्यवृत्तीसंदर्भात आरोप होत आहेत. मात्र घोटाळे करण्याची सवय असलेल्यांना प्रामाणिकपणे काम होत आहे, यावर विश्वासच बसत नाही. सिंचन घोटाळ्याची चौकशी योग्य दिशेने होत आहे. या संदर्भात आणखी अनेक जणांवरदेखील कारवाई करण्यात येईल, असेदेखील मुख्यमंत्री म्हणाले. राज्याच्या ‘जीडीपी’ची वाढ इतर राज्यांच्या तुलनेत चांगली असून पायाभूत सुविधांसाठी राज्य सरकारने कर्ज घेतले आहे. सरकार विकासकामांना कात्री लावणार नाही. त्यामुळे राज्याच्या आर्थिक दिवाळखोरीची काळजी विरोधकांनी करू नये, असा टोलादेखील मुख्यमंत्र्यांनी लगावला.
कर्जमाफी झालेल्या शेतक-यांची तालुकानिहाय नावे जाहीर करण्यात येतील, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले. राज्यात कर्जमाफी पारदर्शक पद्धतीनेच झाली. शेवटच्या पात्र शेतकºयाची कर्जमाफी होईपर्यंत ही प्रक्रिया चालविण्यात येईल. तसेच पात्र असूनदेखील अर्ज न करू शकलेल्या शेतकºयांनादेखील या योजनेत समाविष्ट करण्यात येईल. कर्जमाफीसाठी एकूण ७७ लाख खात्यांचे अर्ज आले. त्यापैकी ६९ लाख खाती प्रोसेसिंगसाठी घेतली. त्यातून जवळपास ४१ लाख खात्यांचे निर्णय झाले असून त्यांच्यासाठी निधीही मंजूर करण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मागील वर्षीच्या तुलनेत  धान, ज्वारी, मूग, उडीद, सोयाबीन या पिकांची आवक वाढली आहे. हिवाळी अधिवेशनात १३ विधेयके प्रस्तावित असल्याची माहितीदेखील मुख्यमंत्र्यांनी दिली. 



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.