चंद्रपूर/प्रतिनिधी:
देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्ष झाली परंतु कुंभार समाज हा सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या अतिशय मागासलेला आहे.समाजाचा विकास व्हावा म्हणून कुठल्याच राज्यकर्त्यांनी प्रयत्न केले नाही.त्यामुळे कुंभार समाजाची दिवसेंदिवस प्रगती होण्याऐवजी तो अधोगतीला आला आहे.त्यामुळे आपल्या न्याय व हक्काच्या विविध मागण्यांना घेऊन आज महाराष्ट्र कुंभार समाज महासंघ च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. मध्यप्रदेश गोवा गुजरात राजस्थान आदी राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी स्वतंत्र माती कला बोर्ड त्वरित स्थापन करावे व समाजाला आर्थिक सांस्कृतिक पारंपरिक स्वावलंबन मिळवून द्यावे. उदरनिर्वाहासाठी भटकंती चे जीवन जगणाऱ्या कुंभार समाजाचा भटक्या विमुक्त जमाती या प्रवर्गात समावेश करावा,कुंभार समाजाला विधानपरिषदेमध्ये प्रतिनिधित्व द्यावे, एमआयडीसी क्षेत्रामध्ये कुंभार व्यावसायिकांना जागा देण्यात यावी. प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मुर्त्यांवर पूर्णपणे बंदी घालावी या सह इतर विविध मागण्यांसाठी आज महाराष्ट्र कुंभार समाज महासंघ च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेकडोच्या संख्येने कुंभार बांधव उपस्थित होते. त्यानंतर आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
SHARE THIS