Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, डिसेंबर ०५, २०१७

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात 40 नवीन वाघ

चंद्रपूर/प्रतिनिधी: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील 
80 च्या जवळपास असणारे वाघ व अन्य वन्यजीवांच्या
संरक्षणासाठी जागतिक दर्जाचे प्रशिक्षण घेवून 40 कमांडो कोर झोनमध्ये आजपासून सक्रीय झाले आहे. चित्याप्रमाणे कारवाईसाठी सज्ज असणारे हे जवान तामीळनाडूतील अनुभवी वरिष्ठांकडून प्रशिक्षण घेवून कार्यवाहीस सिध्द झाले आहे. आगरझरी येथे सोमवारी सांयकाळी या प्रशिक्षणाचा समारोप झाला.

               आगरझरी येथील प्रशिक्षण संस्थेमध्ये तीन दिवसांचे कमांडो प्रशिक्षण नुकतेच घेण्यात आले. तामिळनाडूमध्ये वन्यजीव संरक्षणाचा दांडगा अनूभव असणा-या दोन वरिष्ठ अधिका-यांनी ताडोबा येथे येवून हे प्रशिक्षण दिले. वाघांची शिकार करणारे शिकारी, तस्कर, जंगलात चोरी करणारे चोर, अवैध लाकूड तोड आणि परिसरात घुसखोरी करणारे असामाजिक तत्व यांना धडा शिकविण्यासाठी हे कमांडो कार्यरत असणार आहेत.
 दूरचित्रवाणीवरील सीआयडी या मालिकेमुळे घराघरात पोहचलेले सुप्रसिध्द चित्रपट अभिनेते श्री.शिवाजी साटम यांच्या उपस्थितीत ताडोबाच्या या 40 वाघांचा प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला. यावेळी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक (कोर) किशोर मानकर, उपसंचालक (बफर) गजेंद्र नरवणे, निवृत्त वरिष्ठ अधिकारी अरुण तिखे, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके आदी यावेळी उपस्थित होते.

               यावेळी कमांडो प्रशिक्षणाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. चोरुन लाकुड तोड करणारे आणि वन्यजीवाला धोका पोहचवणा-या तस्करांना जेरबंद करण्यासाठी आकस्मिक व्यूहरचनेचे प्रात्यक्षिक लक्षवेधी होते. यावेळी प्रशिक्षणार्थीतर्फे सुरज मेश्राम, वैशाली जेणेकर, श्रीकृष्ण नागरे, दिलेश्वरी वाढई आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रसिध्द सिनेअभिनेते शिवाजी साटम यांनी ताडोबा हे चंद्रपूरसाठीच नव्हे, महाराष्ट्रासाठी नव्हे तर देशासाठी महत्वाचे पर्यटन स्थळ आहे. वाघाची काळजी घेण्यासाठी वन्यजीवांचा हल्ला सोसणा-या परिवारातील तरुण पुढे येतात आणि जगासाठी वाघ संरक्षित ठेवतात. ही बाब अतिशय महत्वपूर्ण आहे. ताडोबावर माझे प्रेम असल्यामुळे मी कायम या ठिकाणी येत राहतो. मात्र मला आवडणा-या वाघांसाठी राज्य शासन विविध प्रकारे प्रयत्न करते. त्यासाठी जवानांना प्रशिक्षित करते. ही बाब आज प्रत्यक्ष बघून समाधान वाटते. खरे हिरो संरक्षणकर्ते जवान आहेत. त्यांना मी सलाम करतो. अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली. यावेळी या दलातील महिला कमांडोचाही सत्कार करण्यात आला. कमांडो दलातील महिला ताडोबातील वाघीनीसारख्या चपळ असल्याचे गौरवद्गार उपसंचालक (बफर) गजेंद्र नरवणे यांनी काढले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर मानकर यांनी केले. यावेळी त्यांनी राज्य शासनामार्फत कोर व बफर भागातील पुनर्वसित गावासाठी केले जात असलेले प्रयत्न व नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद कमांडो दलाची आवश्यकता या संदर्भात माहिती दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सहा.वनसरंक्षक शंकरराव घुपसे यांनी केले. 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.