Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, नोव्हेंबर १७, २०१७

भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध

  गुजरात विधानसभा निवडणूक

अहमदाबाद –  गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. पहिल्या यादीत 70 उमेदवारांची नावे आहेत. गुजरातमध्ये विधानसभेच्या 182 जागा आहेत. यादीमध्ये पहिलेच नाव मुख्यमंत्री विजय रुपानी यांचे आहे. रुपानी राजकोट पश्चिममधून निवडणूक लढवणार आहेत.
उपमुख्यमंत्री नितीन पटेल मेहसाणा येथून निवडणूक लढवणार आहेत. गुजरातमध्ये दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. 9 आणि 14 डिसेंबरला गुजरातमध्ये मतदान होणार असून 18 डिसेंबरला गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. भाजपा या निवडणुकीत नव्या उमेदवारांना संधी देईल असे वाटत होते. पण पहिल्या यादीवर नजर टाकल्यास भाजपाने जुन्याच चेह-यांना संधी दिली आहे.



भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर पहिली यादी निश्चित करण्यात आली. पक्षाध्यक्ष अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या बैठकीला उपस्थित होते.  गुजरातमध्ये सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपासमोर काँग्रेस आणि पाटीदार आरक्षण आंदोलन समितीचा नेता हार्दिक पटेलने आव्हान निर्माण केले आहे. हार्दिक पटेलची सेक्स सीडीसमोर आल्याने गुजरातमध्ये राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.
मागच्या दोन दशकांपासून गुजरातमध्ये भाजपाची एकहाती सत्ता आहे. ही सत्ता टिकवून ठेवण्याचे भाजपासमोर आव्हान आहे. भाजपाला  प्रस्थापित सरकारविरोधात असणा-या लाटेचा सामना करावा लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमधून येतात. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपाने गुजरातची लढाई प्रतिष्ठेची केली आहे. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदामुळे मोदींचा पंतप्रधानपदाचा मार्ग सुकर झाला होता. मोदींच्या काळात भाजपाने इथे आपली पाळंमुळं अधिक  घट्टपणे रोवली. पण मोदी दिल्लीत गेल्यानंतर गुजरातमध्ये राजकीय उलथापालथी घडल्या.
मोदींच्या नंतर आनंदीबेन पटेल यांची गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली होती. पण नंतर त्यांना हटवून त्यांच्या जागी विजय रुपानी यांना आणण्यात आले. याच दरम्यान गुजरातमध्ये पटेल समाजाचे आरक्षणाच्या मागणीसाठी मोठे आंदोलन उभे राहिले. गुजरातमध्ये मोठया प्रमाणावर हिंसाचारही झाला. पटेल आरक्षण महत्वाचा मुद्दा बनला. गुजरातमध्ये पटेल समाजाने नेहमीच भाजपाला साथ दिली आहे. पण यंदाच्या निवडणुकीत पटेलांना सोबत ठेवण्याचे भाजपासमोर आव्हान आहे.

 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.