Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, नोव्हेंबर १८, २०१७

समाधान वाटेल अशी खड्डेमुक्त मोहीम राबवा

बांधकाममंत्री पाटील यांचे आवाहन - चंद्रपूर जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचा घेतला आढावा

चंद्रपूर : रस्ते दुरुस्ती, त्यातील तांत्रिक अडचणी व खड्डे दुरुस्ती मोहीम यामध्ये कारणमिमांसा न देता जनतेला समाधान वाटेल, अशा पद्धतीच्या खड्डे मुक्त मोहीमेला धडाक्याने पूर्ण करा. 15 डिसेंबरपर्यंत ही मोहीम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण झाली पाहिजे, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आज येथे केले.

चंद्रकांत दादा पाटील खड्डे मुक्त महाराष्ट्र मोहीमेसाठी 34 जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. चंद्रपूर हा त्यांचा या मोहिमेतील 16 वा जिल्हा होता. तत्पूर्वी वर्धा जिल्ह्यात त्यांनी आज बैठक घेतली. 15 डिसेंबरपर्यंत महाराष्ट्र खड्डे मुक्त करण्याचा त्यांनी संकल्प केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तीनही विभागाचा आढावा त्यांनी आज घेतला. यावेळी मुख्य अभियंता उल्हास डेबडवार, अवर सचिव करमरकर, आंतर वित्तीय सल्लागार श्री. मेश्राम, अधीक्षक अभियंता डी.के.बालपांडे आदी उपस्थित होते. श्री. बालपांडे यांनी चंद्रपूर जिल्ह्यात सुरु असलेल्या कामाचा आढावा सादरीकरणामार्फत मांडला. जिल्ह्यातील 2510 कि.मी.लांबीच्या रस्त्यामध्ये 450 लहान मोठे पूल असून जवळपास 40 टक्के खड्डे बुजविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी महामार्गावरील खड्डे बुजविण्यामध्ये उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या चिमूर येथील उपविभागीय अभियंता श्री.टिकले, नागभिड उपविभागीय अभियंता श्री.कोठारी, सिंदेवाही येथील उपविभागीय अभियंता श्री.पुपरेड्डीवार यांचा सत्कार करण्यात आला. चंद्रकांत दादा पाटील यांना सादरीकरण करताना नियोजन भवनाच्या भव्यतेबद्दल व तांत्रिक वैशिष्ट्याबद्दल माहिती देण्यात आली. या नियोजन भवनाच्या निर्मिती प्रक्रियेत मोलाची भूमिका असणारे चंद्रपूरचे उपविभागीय अभियंता उदय भोयर, शाखा अभियंता चंद्रशेखर कोडगीलवार, स्थापत्य अभियंता संजय धारणे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

यावेळी चंद्रकांत दादा पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सामान्य कर्मचाऱ्यांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यत सर्वांशी संवाद साधताना मुंबईच्या वाररुमध्ये कशा पद्धतीने काम सुरु आहे, याची माहिती दिली. नागपूर व चंद्रपूरमध्ये नवनवीन उपाय योजना करुन काही जुन्या इमारतींचे आयुष्य दहा ते पंधरा वर्षांनी वाढविण्यात आले आहे. तांत्रिकदृष्ट्या योग्य असणाऱ्या या बांधकामाला नवे स्वरुप दिल्याबद्दल त्यांनी विभागाच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. खड्डेमुक्त जिल्हा करण्यासाठी यावेळी काही तरुण अभियंत्यांनी वेगवेगळे उपाय सूचविले. तर काहींनी वेगळ्या सूचना केल्या.

सामान्य जनतेला तांत्रिक बाबी माहिती नसल्यातरी त्यांचे समाधान करणे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे खड्डेमुक्त अभियानात देखील काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र समाजातील विविध घटकातील दहा लोकांकडून घेण्याचे आवाहन त्यांनी केले. सरपंचापासून गृहिणीपर्यंत या मोहीमेमध्ये जनसहभाग घ्या, असे आवाहन त्यांनी केले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.