Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, नोव्हेंबर १८, २०१७

शिक्षण पद्धतीत कालसुसंगत बदलाचे आव्हान स्वीकारा

 मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन
हडस हायस्कूलच्या अमृत महोत्सवाचे थाटात उद्घाटन

नागपूर :
हडस हायस्कूल हे नागपूरचे वैभव आहे. आधुनिक तंत्रज्ञानानुरुप युवाशक्ती निर्माण करण्यासाठी शिक्षण पद्धतीत बदल करण्याचे आव्हान स्वीकारण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

लिबरल एज्यूकेशन सोसायटीच्या हडस हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा अमृत महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी होते. तर ज्येष्ठ शास्त्रज्ज्ञ पद्मविभूषण डॉ.अनिल काकोडकर, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. लिबरल एज्यूकेशन संस्थेचे अध्यक्ष पी.व्ही.खांदेकर, सचिव डॉ.ए.पी.जोशी, व्ही.बी.सपळे, के.बी.जोशी, हडस हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती सविता कुंडले, ज्योती बेंदरे, प्राजक्ता शुक्ला, के.व्ही.जोशी, श्रीमती दीपा फडके व श्रीमती कल्याणी शास्त्री आदी उपस्थित होते.


शिक्षण पद्धतीतील बदलाचा स्वीकार करतानाच अनेक प्रतिथयश विद्यार्थी या शाळेने घडविले असल्याचे सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तंत्रज्ञान बदलत असताना त्याला अनुरुप अशा शिक्षण पद्धतीचा स्वीकार करण्याची आवश्यकता आहे. डिजिटलायझेशनच्या काळामध्ये राज्यातील विशेषत: जिल्हा परिषदेच्या ६२ हजार शाळा डिजिटलायझेशन करुन प्रगत झाल्या आहेत. मागील तीन वर्षात शिक्षण क्षेत्रात केलेल्या व्यवस्थेमुळे १८ व्या क्रमांकावरुन तिसऱ्या क्रमांकावर प्रगती केली आहे. उत्तम शिक्षण दिले तर परिवर्तन घडू शकते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले की, बदलत्या व्यवस्थेनुरुप युवाशक्ती निर्माण करण्यासाठी शैक्षणिक बदलाचा स्वीकार आवश्यक आहे. विकासामध्ये शैक्षणिक संस्थांचे महत्त्वाचे योगदान असून नागपूर शहरात आंतरराष्ट्रीय संस्था सुरु झाल्या आहेत. तसेच टीसीएसचे मोठे केंद्र सुरु होत असून ऐरोस्पेस पार्क सुद्धा सुरु होत आहे. याचा लाभ घेण्यासाठी शिक्षण पद्धतीत बदल करुन त्या अनुरुप शिक्षण देणारी व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे. हडस सारख्या संस्था या बदलाचा स्वीकार करुन एक आधुनिक संस्था म्हणून ओळख निर्माण करतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. हडस संस्थेतर्फे निर्माण होत असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाला शासनातर्फे संपूर्ण सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले, सामान्य शिक्षक हे हडस प्रायमरी स्कूलचे संस्थापक होते. हे या शाळेचे वैशिष्ट्य आहे. व्यावसायिकतेच्या दृष्टीकोनातून या शाळेची निर्मिती झाली नसून त्यामागे शिक्षणाची तसेच त्यागाची भावना आहे. आज स्पर्धेचे युग आहे. यात टिकून राहायचे असेल तर काळानुरुप परिवर्तन होणे आवश्यक आहे. सद्यस्थितीला नागपूरमध्ये ३८ इंजिनिअरिंग कॉलेजेस आहे. येथे ४५० कोटी रुपयांचे सिम्बॉसिस इन्स्टिट्यूटचे काम सुरु झाले आहे. अनेक मोठमोठ्या कंपन्या येथे उद्योग सुरु करण्यासाठी समोर येत आहे. ही बाब निश्चितच स्पृहणीय आहे. योगगुरु बाबा रामदेव हे २ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. नागपुरात मोठे उद्योग येत आहे. या नवनवीन उद्योग धंद्यामुळे स्थानिकांना निश्चितच रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. या उद्योगधंद्यामध्ये विदर्भ तसेच स्थानिकांना प्राधान्याने रोजगार प्राप्त होणार आहे. यासाठी नागपुरातील उद्योगांना सक्षम मनुष्यबळ पुरविण्यासाठी शिक्षण संस्थांनी उत्तम कौशल्ययुक्त विद्यार्थी तयार केले पाहिजे. यासाठी विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देण्यासाठी शिक्षणसंस्थांनी पुढाकार घ्यावा.

मुल्य शिक्षणाबाबत बोलताना ते म्हणाले की, शिक्षणामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षणासमवेत विद्यार्थ्यांना नैतिक मुल्यांचे शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. कारण संस्कारक्षम पिढीच कुटुंबसंस्था टिकवून ठेऊ शकते आणि कुटुंबसंस्था टिकून राहिल्या तरच समाजस्वास्थ टिकून राहील. यासाठी विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मुल्यांचा संस्कार रुजविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

ज्येष्ठ शास्त्रज्ज्ञ डॉ.अनिल काकोडकर म्हणाले, शैक्षणिक संस्थांच्या विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करताना पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, पोषक वातावरण असणे आवश्यक आहे. शिक्षणापुढे आव्हाने स्वीकारताना शिक्षणामधील बदलाचा स्वीकार करायला हवा. संपूर्ण क्षमता असलेला विद्यार्थी घडविण्यासोबतच नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार व बदलत्या संदर्भात शिक्षण सुद्धा अनुरुप असायला हवे. त्यासाठी विद्यार्थ्यांची तयारी करणे हे आव्हान शिक्षण संस्थांनी स्वीकारावे.

संस्थेचे सचिव डॉ.ए.पी.जोशी यांनी प्रास्ताविक केले. सुरुवातीला शाळेच्या प्रगतीचा आलेख दाखविणारा माहितीपट दाखविण्यात आला. ‘अमृत गाथा’ स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.