Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, ऑक्टोबर ०४, २०१७

जावयाचा तोरा....



आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जावयाला म्हणजे मुलीच्या नवऱ्याला विशेष मान असतो. विशेष म्हणजे येवढा की साक्षात देव. आणि त्या जावयाचे आई, वडील, परिवार म्हणजे साक्षात देवाधी देव ब्रह्मा, विष्णू आणि महेश. अगदी मुलीचा साखरपुडा होण्यापासून ते जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत या लोकांना मुलीचा परिवार मुलासारखा, फूलासारखा जपत असतो. सोय असो की नसो त्यांच्या आवडी निवडीचा पूर्ण प्रामाणिक पणे सन्मान करीत असतो. जावई येणार म्हणजे अशी तयारी केली जाते जसे साक्षात प्रभु श्रीराम चौदा वर्षाच्या वनवासानंतर आपल्या अयोध्या नगरीत प्रवेश करीत आहे. घर कसं एकदम आरश्या सारखं चकचकीत आणि सुसज्ज केल जातं. अंथरुन नवे, चादर नवी, सुवासिक साबण, नवा कोरा टॉवेल, पाय धुवायला पाणी, पक्वान्नाची रेलचेल, अहेर, कपडे, भेट वस्तू इत्यादि. येवढं सगळं केवळ या यासाठी केलं जातं की जावई बापू खुश राहावे आणि आपल्या काळजाच्या तुकड्याला म्हणजे मुलीला सुद्धा तेवढ्याच प्रामाणिकपणे प्रेम दिलं पाहिजे, जपलं पाहिजे, खुश ठेवलं पाहिजे..

पण ज्या जावयाची आणि त्यांच्या परिवारांची लोभी प्रवृत्ती असते ते कधीही असल्या सन्मानाने आणि आदर सत्काराने संतुष्ट होत नाहीत. आणि जे जावई खरेच मुळातुनच प्रामाणिक आणि संस्कारी असतात त्यांना असला मानपान नकोच असतो. उलट प्रामाणिक आणि संस्कारी प्रवृत्तीचे जावई आपल्या सासरच्या मंडळींचा फार आदर करतात आणि त्यांना यथासंभव मदत सुद्धा करतात. पण असल्या प्रामाणिक आणि संस्कारी जावयांचे प्रमाण तसे अल्पच आहे...

मला आजपर्यंत एक गोष्ट समजली नाही जावयाची अशी तोरा, गुर्मी दाखविणारी मानसिकता का असावी ? त्यांच्या पण बहिणी दुसऱ्या परिवारात विवाह झालेल्या असतात. त्यांचे नवरे जेव्हा सासुरवाडीला येऊन असा तोरा दाखवितात तेव्हा यांना जावई फार जलाल अहंकारी, आणि गर्विष्ट वाटतो. आणि स्वत: जेव्हा बायकोच्या माहेरी जातात तेव्हा असा तोरा दाखवून मी फार स्वाभिमानी आहे असा शेरा मारतात. स्वत:हून बाजार मांडल्यासारखे हूंड्याची मागणी करतात. गाडी, घोडा, बंगला सोनं- नानं, जे काही भीक मागू शकतात ती मागतात. तेव्हा हा स्वाभिमान काही काळासाठी गहाण ठेवण्यात येतो. हं, ही एकच भीक अशी असते की जी ताठ मानेने मागितली जाते. आणि मुलीच्या आई वडिलांकडून मान झुकवून जड अंत:कारणाने दिली जाते. आणि येवढी मदत करूनही स्वत:ची आयुष्यभराची कमाई आणि काळजाचा तुकडा जावयाच्या पदरात टाकून सुद्धा आयुष्यभर स्वत: एक याचक म्हणून जावई आणि त्यांच्या परिवाराची मनधरणी, विनवणी हे मुलीकडले लोकं करीत असतात. असे का? हा प्रश्न सर्व अकडू जावयांनी प्रामाणिकपणे स्वतःला विचारावा.

समाजातून हे चित्र का पालटत नाही ? आपली एखादी दहा रुपयांची नोट हरवली तर आपणांस रात्रभर झोप येत नाही. मग विचार करा,जे आईवडील आपल्या काळजाचा तुकडा परक्या व्यक्तीच्या स्वाधीन करून समाजात तुमचा मान, प्रतिष्ठा वाढवितात, आयुष्यभर तुम्हांस देवासारखा सन्मान देतात,तुमची प्रत्येक आवड निवड आर्थिक परिस्थिती नसतांना सुद्धा स्वत:ला गहाण ठेऊन पूर्ण करतात. वरून संपूर्ण आयुष्य तुम्ही त्यांच्याकडूनच मानपानाची अपेक्षा करता ? आणि येवढं करूनही त्यांच्या काळजावर काय बितत असेल जेव्हा त्यांना कळते की जावई मुलीला त्रास देतो, छळतो, मारपीट करतो, सुखी ठेवत नाही, प्रेम देत नाही, दारू पितो, पर स्त्रीयांशी सबंंध ठेवतो, इत्यादि.

माझ्या मते आता ही मानसिकता थोडी फार बदलली असली तरीपण अजूनही या बाबतीत विचारसरणीत, संवेदनशीलते मध्ये बऱ्याच सुधारणांची आवश्यकता आहे.
'आम्ही जावई' हा तोरा आता संपायला पाहिजे. सासू सासऱ्यांना देवतुल्य दर्जा द्यायला पाहिजे. त्यांच्या काळजाच्या तुकड्याला जीवापार जपायला पाहिजे.
त्यांच्यामुळे आपण आज वैवाहिक जीवन जगत आहोत. आपणास समाजात मानपान आहे. पितृत्व सुख लाभले आहे. ज्या लोकांमुळे तुमच्या जीवनाला रंग आला, बहर आला, अश्या सासू सासऱ्यांना जावया समोर झुकण्याची वेळ कधीच येऊ नये. उलट जावई आणि त्यांच्या परिवाराने मुलीच्या सासरी जाऊन नेहमी त्यांचा आदर सत्कार करावयास पाहिजे. या अनमोल सासरवाडीच्या ऋणातून कसे मुक्त होता येईल? यासाठी प्रतिक्षण प्रयत्नरत असले पाहिजे.

बरेचदा अस अनुभवास येतं की, आवश्यकते पेक्षा जास्त मानपान, आदर सत्कार बऱ्याच लोकांना पचत नाही. आणि त्याचा दुरुपयोग होतो. भिकाऱ्याला ओकाऱ्या होण्याची संभावना असते. नाते ऋणानुबंध तोऱ्याने, अहंभावाने, गर्वाने, अहंकाराने कोमेजुन जातात. वेळ प्रसंगी नात्या सबंंधात येवढे वितुष्ट येते की वेळ प्रसंगी तर प्राणास सुद्धा मुकावे लागते.

याउलट प्रेमाने, त्याग,समर्पणाने काळजी घेतल्याने, एकमेकांच्या भावना समजून घेतल्याने नाते सबंध फळतात, फुलतात, बहरतात, दूरवर स्नेहाचा सुगंध, माधुर्य पसरवितात. नातं काय आहे ?याला तेवढे महत्व नाही. नाते सबंध आम्ही कसे जोपासतो, कसा त्याचा आदर सत्कार करतो? हे जास्त महत्वाचे आहे ? प्रेम आणि माणुसकीलाच जपणे महत्वाचे आहे. जीवन उर्मीने, तोऱ्याने, गर्मीने नाही उर्जेने, सकारात्मक दृष्टीकोनाने यशस्वी व शेवटास जात असते. माणसाने माणसात ईश्वर शोधावा हाच खरा धर्म आणि नात्यांचा मान सन्मान, सत्कार आहे.



SUNIL PATOLE,
सुनील पाटोळे,
169, मानेवाड़ा बेसा रोड,
अलंकार नगर,
नागपुर - 440044
दूरध्वनी क्र.
097760 38850
070777 56627
Email mail :-
patolesunil009@gmail.com

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.