Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, मे ०६, २०१४

लोकसभा निवडणुकीचा निकाल काय असणार

सर्वत्र उन्हाचा पारा वाढला आहे. उष्णतेच्या लाटेसोबतच निकालाची चर्चाही गरगरमागरम होत आहे. लग्नसोहळा, स्वागत समारंभ, अंत्ययात्रा, नवस, वाढदिवस असो वा सोयरीक संबंधी बैठक असो प्रत्येक ठिकाणी द्रपूर-वणी-आर्णी लोकसभा निवडणुकीचा निकाल काय असणार निकालाची चर्चा ऐकायला मिळत आहे.
चहा टपरी, पान टपरी, चौका-चौकात, बाजार, मंदिराच्या पारांवर, उद्योगांच्या कार्यालयात अशा चर्चा रंगत आहेत. चंद्रपूर-आर्णि लोकसभा निर्वाचन क्षेत्रात राजुरा, बल्लारपूर, चंद्रपूर, वरोरा, वणी व आर्णी अशा सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. यातील चंद्रपूर जिल्ह्यातील चार तर यवतमाळ जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. या लोकसभा निवडणुकीत एकूण १८ उमेदवार रिंगणात होते. यापैकी कोण बाजी मारणार, हे अद्यापही कुणीही ठाम सांगू शकत नाही. हे निवडून येतील, ते विजयी होतील असे तर्कवितर्क सुरू आहेत.
१८ उमेदवारांपैकी खरे राजकारणी कमी आणि हवसे-नवसे उमेदवारच अधिक आहेत. खरी लढाई भाजपा-सेना युतीचे हंसराज अहीर, काँग्रेस-राकॉं आघाडीचे संजय देवतळे आणि शेतकरी संघटना-आप युतीचे अँड. वामनराव चटप यांच्यातच असल्याचा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे. मागील लोकसभा निवडणुकीत खा. हंसराज अहीर विजयी झाले होते. यांना काँग्रेस व बसपाच्या उमेदवारांशी टक्कर द्यावी लागली होती. त्यावेळी काँग्रेसच्या एका गटाचा छुपा पाठिंबाही त्यांना मिळाला होता, असे सांगितले जाते. ज्या विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचे आमदार होते, त्याच क्षेत्रात भाजप आघाडीवर होता. मात्र यावेळी चित्र वेगळे आहे. आपच्या झाडूने काँग्रेस व भाजप या दोन्ही उमेदवारांना चांगलेच कोंडीत पकडल्याचे चित्र दिसले.
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी येत्या १६ मे रोजी होणार असून संध्याकाळपर्यंत निकाल हाती येणार आहे. मात्र सध्या सर्वत्र निकालासंदर्भात अंदाज बांधले जात आहेत. मागील वेळी ज्या केंद्रावर मतदानाची टक्केवारी अधिक होती, त्या ठिकाणी यावेळी टक्केवारी कमी दिसून आली. ही मतदानाची कमी टक्केवारी कोणाच्या पथ्यावर पडेल? याचा अंदाजही समजू शकत नाही. दरवेळीचा भाजपा उमेदवाराचा प्रतिस्पर्धी उमेदवार यावेळी बदललेला असल्याने या राजकीय संघर्षात कोण दिल्लीत पोहचणार? की दोघाच्या भांडणात तिसर्‍याचा लाभ होणार, हे १६ मे रोजी कळणारच आहे. भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी लोकसभा क्षेत्रात देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, नितीन गडकरी आले होते. काँग्रेस उमेदवारासाठी राहूल गांधी, पृथ्वीराज चव्हाण व सिने कलावंत उतरले तर आपचे उमेदवार कार्यकर्त्यांना घेवून शहरात व ग्रामीण भागात जोरदार प्रचार केला. 

मतमोजणीसाठी अधिकार्‍यांना प्रशिक्षण

चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदार संघासाठी १६ मे रोजी मतमोजणी होणार आहे. मतमोजणी सुरळीत पार पाडण्यासाठी मतमोजणी अधिकार्‍यांना सोमवारी प्रशिक्षण देण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, अप्पर जिल्हाधिकारी सी.एस. डहाळकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी दामोधर न्हाने व सर्व सहायक निवडणूक अधिकारी उपस्थित होते.
मतमोजणी दरम्यान काय काळजी घ्यायची, याबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. मत मोजणीचे हे पहिले प्रशिक्षण असून दुसरे प्रशिक्षण १३ मे रोजी घेण्यात येणार आहे. बाहेरगावी असणार्‍या अधिकार्‍यांची राहण्याची व्यवस्था चंद्रपूर येथे करण्यात आली असून १६ मे रोजी सकाळी ५ वाजता निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत अधिकारी व कर्मचारी सरमिसळ करण्यात येणार आहे.
सकाळी सात वाजता स्ट्राँग रूम उघडण्यात येणार असून प्रथम पोस्टल बॅलेट पेपरची मोजणी होईल. त्यानंतर लगेच प्रत्यक्ष मतमोजणीस सुरुवात होईल.
प्रत्येक विधानसभा मतदार संघासाठी १४ टेबल लावण्यात येणार आहेत. सुरक्षेच्या कारणाने ओळखपत्राशिवाय मत मोजणी केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. संपूर्ण मत मोजणी प्रक्रिया सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या निगराणीत होणार असून मत मोजणीसाठी नियुक्त अधिकारी कर्मचार्‍यांना मत मोजणी केंद्रात मोबाईल फोन तथा कॅमेरा घेऊन जाण्यास सक्त मनाई असणार आहे. हाच नियम राजकीय पक्षांच्या मत मोजणी एजंटांनाही लागू असणार आहे. नागरिकांना कवायत मैदान या ठिकाणी डिस्प्ले बोर्ड लावण्यात येणार आहे. जेनेकरून नागरिकांना याद्वारे अद्यावत निकाल पाहता येणार आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.