चंद्रपूर- शासनाने गेल्या दोन दशकात नक्षलग्रस्त भागात विकासाच्या नावाखाली प्रचंड पैसा ओतला. त्यानंतरही नक्षलवाद कमी झाला नाही. शासनाचा हा प्रयत्न गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त आदिवासी भागातील नागरिकांना न्याय देण्यासाठी होता. शासनाच्या या योजनांचे नक्की फलित काय हे जाणून घेण्यासाठी जानेवारी २0१४ मध्ये शोधयात्रेचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती आयोजन समितीचे सदस्य व मनपा नगरसेवक संजय वैद्य यांनी दिली. यावेळी आयोजन समितीचे सदस्य प्रा. अरविंद सोवनी यांची उपस्थिती होती. वैद्य म्हणाले, आदिवासींच्या विकासासाठी शासन आज प्रयत्नशील आहे. परंतु, हे शहाणपण शासनाला नक्षलवाद्यांची चळवळ सुरू झाल्यानंतर सूचले. तोपर्यंत कोणत्याही राजकीय नेतृत्त्वाचे लक्ष गडचिरोली जिल्हय़ातील आदिवासींकडे गेले नाही. नक्षल चळवळ सुरू झाली तेव्हा नक्षल्यांनी अरण्य प्रदेशात राहणार्या गरीब, शोषित, निरक्षर व नेतृत्त्वहीन आदिवासींना न्याय मिळवून देण्याची भूमिका घेतली. परंतु, हा उद्देश नंतर बदलत गेला. या चळवळीला हिंसक स्वरूप प्राप्त झाले. शासनाने या समस्येशी लढण्यासाठी पोलिस दल तैनात केले. पोलिस आणि नक्षली यांच्या कचाट्यात मात्र निष्पाप आदिवासी भरडल्या गेला. पोलिसांना मदत केल्यास नक्षल्यांचा त्रास तर नक्षल्यांना मदत केल्यास पोलिसांचा त्रास सहन करण्याचे दुर्भाग्य या आदिवासींना मिळाले आणि आदिवासी समाजातील आक्रोश वाढतच गेला. या पार्श्वभूमीवर नक्षल प्रभावातील आदिवासी भागाच्या वास्तवाचा शोध घेण्यासाठी शोधयात्रेचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. या यात्रेदरम्यान गडचिरोली जिल्हय़ातील कोरची, धानोरा, एटापल्ली, भामरागड, अहेरीच्या परिसरातील गावांचा अभ्यास करण्यात येणार असून अतिदुर्गम भागातील अतिसामान्य माणसाच्या जीवनातील समस्यांचा शोध, सरकारी विकास योजनांच्या अंमलबजावणीचा शोध, सामान्य माणसाच्या विकासाच्या स्वप्नांचा शोध, हिंसाचाराच्या मार्गाने समस्या निवारण होवून सामाजिक विकास होईल का, याबद्दल सामान्यांच्या भूमिकेचा शोध घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या शोधयात्रा मोहिमेत लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजन समितीचे शाम पांढरी पांडे, प्राचार्य लक्ष्मीकांत तुळणकर, विजय लापालीकर, प्रा. प्रदीप मेर्शाम, सुशील सहारे, दत्ता शिर्के, प्रा. अशोक बोरकर, प्रा. श्रीकांत भोवते व जितेंद्र श्रीरामे यांनी केले आहे. |
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
रविवार, डिसेंबर २२, २०१३
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
- Blog Comments
- Facebook Comments