यवतमाळ- लग्नाला नकार दिल्याचा वचपा काढण्यासाठी लग्न ठरलेल्या युवकाने त्याच्या होऊ न शकलेल्या युवतीची दगडाने ठेचून हत्या केली. ही खळबळजनक घटना दारव्हा तालुक्यातील सेवादासनगर परिसरात गुरुवारी (ता. 28) सकाळी उघडकीस आली.
सुलोचना महादू जाधव (वय 18, रा. सेवादासनगर) असे मृत युवतीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुलोचना हिचा विवाह त्याच गावात राहणारा आणि तिचा नातेवाईक असलेला फुलसिंग हरजी राठोड (वय 23) याच्याशी करण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र, लग्न ठरविल्यानंतर काही दिवसांतच फुलसिंग हा मद्यपी असल्याची बाब सुलोचनाच्या नातेवाइकांच्या लक्षात आली होती. या कारणावरून तिच्या नातेवाइकांनी लग्न मोडून टाकले होते. लग्न मोडल्याच्या कारणावरून फुलसिंगने गेल्या काही दिवसांपासून सुलोचनाला त्रास देणे सुरू केले होते.
दरम्यान, सुलोचनाने मांगूळ येथील साखर कारखान्यात काम करण्यासाठी जाण्याचे ठरविले. त्यासाठी ती गुरुवारी (ता. 28) पहाटेच उठली. त्यानंतर पहाटे साडेपाचच्या सुमारास ती प्रात:विधीसाठी गावाशेजारी असलेल्या शेताकडे गेली. त्या ठिकाणी पूर्वीपासूनच दबा धरून बसलेल्या फुलसिंग राठोड याने तिला पकडून तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. तिने नकार दिला असता चिडलेल्या फुलसिंगने दगडाने ठेचून तिची हत्या केली. त्यानंतर अर्धनग्न अवस्थेतील तिचा मृतदेह रस्त्यापासून काही अंतरावर एका खड्ड्यात फेकून दिला.
गुरुवारी सकाळी त्या ठिकाणी गेलेल्या दुसऱ्या महिलांना मृतदेह आढळून आला. त्यांनी याची माहिती देताच संपूर्ण गावाने त्या परिसरात धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच लाडखेड पोलिस ठाण्याचे ठाणेदार संजय शिरभाते आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता रवाना केला.
दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान त्यांना फुलसिंगची माहिती मिळाली. या माहितीवरून फुलसिंगच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरातील पेटीतून रक्ताने माखलेले कपडे जप्त करण्यात आले. मात्र, फुलसिंग पसार होण्यात यशस्वी झाला. या प्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून लाडखेड पोलिसांनी फुलसिंग राठोडविरुद्ध खून आणि बलात्काराच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.