जिल्हाधिकारी विजय वाघमारे
चंद्रपूर दि.23 –एड्स या भयंकर रोगापासून चंद्रपूर जिल्हयाला मुक्त करण्यासाठी सर्व उपाययोजना आखण्यात येणार असून एड्सबाबत शुन्य गाठायचा आहे, असे मत जिल्हाधिकारी विजय वाघमारे यांनी जिल्हा एड्स प्रतिबंध व संनियंत्रण समितीच्या बैठकीत व्यक्त केले. जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद सोनोने , मनपा उपायुक्त देवतळे, स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा प्रशासनाने प्रभावी उपाययोजना आखल्यामुळे चंद्रपूर जिल्हयात गेल्या चार वर्षात एचआयव्ही बाधित रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी ती शुन्य व्हायला पाहिजे असेही वाघमारे म्हणाले. औद्यागिक वसाहतीत स्थलांतरीत कामगार मोठया प्रमाणात आहेत अशा ठिकाणी तपासणी मोहिम राबविण्यात येते. मात्र काहीवेळा स्थलांतरीत कामगारांचे समुपदेशन करण्यासाठी उद्योग समुहाकडून सहकार्य मिळत नसल्याचे स्वयंसेवी संस्थांनी सांगितले. यावर उद्योग समुहांना पत्र पाठविण्याचे बैठकीत ठरले.
एचआयव्ही बाधितांना शासकीय योजनांचा लाभ देण्यावरही बैठकीत भर देण्यात आला. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, आधार कार्ड व रेशन कार्डसाठी विशेष मोहिम राबविण्याच्या सुचना वाघमारे यांनी केल्या.
एचआयव्ही बाधितांसाठी सर्व शासकीय रुग्णालयात समूपदेशन सेवा देण्यात येत असून उपकेंद्रस्तरावरही चाचणी सेवा पुरविण्यात येत असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांनी सांगितले. अति जोखमीचे गट देहविक्रय करणाऱ्या स्त्रिया, ट्रक चालक व स्थलांतरीत कामगार यांचेकरीता विशेष हस्तक्षेप लक्ष्यगट स्थापन करण्यात आल्याचे ते म्हणाले. ग्रामसभेमध्ये हा विषय ठेवावा अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली. खाजगी रुग्णालयात आयसीटीसी केंद्र स्थापन करण्याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली.