२ सख्ख्या भावांनी मिळून ९ घरी दरोडा टाकल्याची माहीती चोरीच्या गुन्ह्याचा तपास करीत असताना
समोर आली. चोरी केलेलं सोन दुकानात विक्रीसाठी नेत असल्याची भनक पोलिसांना लागली आणि
पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत या दोघांनी जिल्ह्यात वेगवेगळ्या अशा ९
ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिला. त्यानंतर पोलिसांनी या चोरट्यांकडून सोन्याचे दागिने, रोख असा सुमारे ६ लाख आठ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. प्रभु सुब्रमण्यम सानिपती, राकेश सुन्रमण्यम सानिपती अशी अटकेतील चोरट्यांची नावे आहेत.
पडोली पोलिस ठाणे हद्दीतील वांढरी फाटा येथील श्रीकांत सुनील अधिकारी हे कुटुंबीयांसह हॉलमध्ये झोपी गेले होते. चोरट्याने हॉलच्या समोरील दरवाजाला कडी लावून बेडरूमच्या खिडकीची ग्रील वाकवून प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील लॉकर उघडून १ लाख ६४ हजार ५०० रुपयांचे सोने, चांदीचे दागिने आणि महत्त्वाची कागदपत्रे चोरून नेली. ही घटना १७ जूनला उघडकीस आल्यानंतर पडोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पडोली पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पडोली,रामनगर, चंद्रपूर शहर, भद्रावती येथून घरफोडीच्या घटनांबाबत माहिती घेतली. त्यानंतर पोलिसांनी प्रभु सुब्रमन्यम सानिपती, राकेश सुत्रमन्यम सानिपती या दोघांना ताब्यात घेत चौकशी केली. तेव्हा वांढरी फाटा येथील घरफोडोसह भद्रावती, दुर्गापूर, वरोरा पोलिस ठाणे हद्दीत घरफोडी केल्याची कबुली दिली.