राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी माध्यमांशी संवाद साधून पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीसंदर्भात माहिती दिली. बैठकीत पक्षसंघटनेबाबत चर्चा करण्यात आली. तसेच पक्षांतर्गत निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येईल. यासाठी पक्षांतर्गत राज्य निवडणूक अधिकारी म्हणून जयप्रकाश दांडेगावकर तसेच मुंबई विभागीय निवडणूक अधिकारी म्हणून दिलीप वळसे पाटील यांनी निवड करण्यात आली आहे.
बूथ कमिट्या बळकट करण्यासाठी पक्षाच्या काही लोकांवर जबाबदारी देण्यात आली आहे. ज्यामध्ये विदर्भ, नागपूर विभाग अनिल देशमुख व मनोहर चंद्रिकापुरे, विदर्भ, अमरावती विभाग राजेंद्र शिंगणे व अमोल मिटकरी, कोकण विभाग जितेंद्र आव्हाड व सुनिल भुसारा, मराठवाडा विभाग धनंजय मुंडे, विक्रम काळे आणि सतिश चव्हाण, पश्चिम महाराष्ट्र विभाग शशिकांत शिंदे व अरुण लाड, पश्चिम महाराष्ट्र विभाग (पुणे) सुनिल शेळके व चेतन तुपे, पश्चिम महाराष्ट्र विभाग (सोलापूर) अशोक पवार व चेतन तुपे, खान्देश विभाग अनिल पाटील व एकनाथराव खडसे, कोकण विभाग अनिकेत तटकरे व शेखर निकम यांच्यावर जबाबदारी सोपावण्यात आली आहे. यावेळी बूथ किती कालमर्यादेत पूर्ण करावे याचे मार्गदर्शन पक्षश्रेष्ठींकडून करण्यात आले.
या बैठकीत माजी मंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांचा मुद्दा उपस्थित केला. परमबीर सिंह यांचे निलंबन रद्द करण्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तीव्र आक्षेप आहे. या अधिकाऱ्याने अनिल देशमुख यांच्यावर खोटे ऐकीव आरोप लावले ज्यातून राज्य सरकारची बदनामी करण्यात झाली. या सर्व मुद्द्यांवर पक्षाचे नेते, आमदार आवाज उठवणार असल्याचे महेश तपासे यांनी सांगितले.