*सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर आणि अयोध्या भावनिक 'सेवासेतू' बांधण्याचे पवित्र कार्य केले*
*उत्तर प्रदेशच्या मंत्र्यांनी व्यक्त केली मुनगंटीवार यांच्याबद्दल कृतज्ञता*
*भव्यदिव्य काष्ठपूजन व शोभायात्रेच्या सोहळ्याने भारावले तिनही मंत्री*
*चंद्रपूर, दि. ३१ :* अयोध्येत निर्माणाधीन असलेल्या श्रीराम मंदिरासाठी देशातील सर्वोत्तम सागवान काष्ठ अयोध्याकडे रवाना झाले,त्यावेळी उत्तर प्रदेशच्या तीनही मंत्र्यांनी महाराष्ट्राचे वन, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.चंद्रपूर ते अयोध्या अशा भावनिक सेवासेतू बांधण्याचे ना. मुनगंटीवार यांनी पवित्र्य कार्य केले आहे, त्यामुळे त्यांनी प्रभू श्रीरामप्रती आपला भक्तीभाव अंत:करणापासून दाखवून दिला आहे.
उत्तर प्रदेशचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री योगेंद्र उपाध्याय म्हणाले की, ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी सागवान काष्ठ समर्पणाच्या कार्यक्रमाला भव्यदिव्य सोहळ्याचे स्वरुप प्राप्त करू दिले. श्रीराम नवमीच्या पूर्वसंध्येलाच हा मोठा उत्सव साजरा झाल्याने अवघे बल्लारपूर व चंद्रपूर राममय झाले होते. एखाद्या रामभक्ताने, कारसेवकाने श्रीरामाप्रती आपल्या भावना कशा व्यक्त कराव्या हे ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून शिकावे.
उत्तर प्रदेशचे वन व पर्यावरण मंत्री डॉ. अरुणकुमार सक्सेना म्हणाले, प्रभू श्रीरामाने उत्तरेतून दक्षिणेकडे प्रवास करताना संपूर्ण देशाला एका सूत्रात बांधले. वनमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी दाखवलेला पुढाकार नक्कीच पुढे चंद्रपूर आणि अयोध्या यांच्यात भावनिक 'सेवासेतू' बांधण्याचे पवित्र कार्य करेल. स्टॅम्प व न्यायालय शुल्क राज्यमंत्री रवींद्र जयस्वाल म्हणाले की, देशातील सर्वोत्तम सागवान लाकूड देण्याची संकल्पना ना.सुधीर मुनगंटीवार यांचीच आहे. काष्ठपूजन आणि काष्ठ समर्पणासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार हा खरोखरच कौतुकास्पद आहे.