Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, फेब्रुवारी ०७, २०२३

भाजप मध्ये महापुरुषांचा अवमान करण्याची स्पर्धाच; सुषमा अंधारे


जुन्नर येथे महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने उपस्थितांना संबोधित करताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे.


जुन्नर /आनंद कांबळे
देशात व राज्यात भाजप जातीपातींचे द्वेषमूलक राजकारण करत आहे. भाजप मध्ये महापुरुषांचा अवमान करण्याची स्पर्धाच लागलेली आहे. याबाबत भाजप चे राज्यातील नेते अवाक्षरही काढत नाहीत तर राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नावाने कोश्यारी तर बोलण्याने विषारी आहेत अशी जळजळीत टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली. जुन्नर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात झालेल्या महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने आयोजित केलेल्या जाहीर सभेत अंधारे बोलत होत्या.
यावेळी आमदार सचिन अहिर, माजी आमदार बाळासाहेब दांगट, जयश्री पलांडे, जिल्हा प्रमुख सुरेश भोर,अनिष गाढवे, गुलाब पारखे, ऑड अविनाश रहाणे, युवा सेनेचे तालुकाध्यक्ष विकी पारखे यांसह शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी अंधारे म्हणाल्या की, राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे भागीदार असलेले अजय अशर यांना नीती आयोगावर पाठवले असून किरीट सोमय्या यांनी अजय अशर यांचे बँक अकाउंट तपासावे अशी मागणी केली. राज्यात महिला, विद्यार्थी, शेतकरी व कामगार यांच्या प्रश्नांवर गेली पाच सहा महिने सत्ताधारी काहीच बोलत नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने विमा कंपन्यांना शेतकऱ्यांना पैसे देण्याचे आदेश देऊनही विमा कंपन्या ऐकत नसल्याने नक्की विमा कंपन्या कुणाच्या आशीर्वादाने चालतात असा प्रश्न देखील अंधारे यांनी यावेळी विचारला. बागेश्वर बाबा, संभाजी भिडे यांच्याकडून होणाऱ्या अवमानजनक वक्तव्यांबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकही शब्द काढत नाहीत.
जिल्हा परिषदेच्या शाळांच्या शिक्षणाचा दर्जा घसरलेला असून सर्वसामान्याच्या मुलांना दर्जेदार शिक्षण देणाऱ्या संस्थांची फी परवडत नाही. शासन विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर पैसा खर्च करायला नकार देत असल्याचे सांगत अंधारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आजपर्यंतच्या जाहिरातीच्या खर्चाचा हिशोबच भर सभेत वाचून दाखविला. 
       मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी भाजप सोबत गेले असे म्हणतात तर वेळोवेळी महाराष्ट्राचा होणारा अपमान, राज्यातील उद्योग बाहेरच्या राज्यात जात आहेत तर कर्नाटक सरकार राज्यातील गावे जोडण्याचा प्रयत्न करत आहे. हे सगळं होत असताना मुख्यमंत्री शिंदे काहीच का बोलत नाहीत असा सवाल यावेळी अंधारे यांनी विचारला. विधानपरिषदेच्या निवडणुकीत ज्यांनी नाशिक मध्ये खड्डा खोदण्याचा प्रयत्न केला त्यांच्याच नागपुरात मतदारांनी त्यांच्यासाठी खड्डा खोदला असल्याची टीका भाजपवर केली. 
       यावेळी अंधारे यांनी शैक्षणिक संस्था व पुणे नाशिक रेल्वेच्या प्रश्नावर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर तर माजी आमदार शरद सोनवणे यांच्यावर सोनवणे हे एकटे उभे राहिले तर कधीच निवडून येऊ शकत नाही अशी टीका केली.    
        यावेळी सचिन अहिर यांनी सांगितले की, भविष्यात देशाचे नेतृत्व करण्याची संधी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आली असती, हे ओळखून अडीच वर्षांपासून त्यांच्याविरोधात षडयंत्र रचण्याचे काम विरोधकांनी केले. लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांनी सगळे अधिकार देऊन देखील पक्ष वाढवता आला नाही, कार्यकर्त्याना थांबवता आलं नाही, अडचणीच्या काळात साथ सोडली अशी टीका आढळराव पाटील यांच्यावर केली तर कुठे गेला बिबट्याचा पार्क असा प्रश्न विचारत आमचाच बिबट्या तिकडे पळायला लागला असल्याचे सांगत माजी आमदार शरद सोनवणे यांच्यावर टीका केली. तर पक्षाचा तालुक्यातील आणि जिल्ह्यातील लोकडाऊन आता उठलेला आहे असे देखील अहिर म्हणाले. 


     - 
     नरेंद्र मोदी, शरद पवार, देवेंद्र फडणवीस हे मार्गदर्शक असल्याचे सांगणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी  गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या चित्रपटातील मकरंद अनासपुरे यांची नारायण वाघ ही भूमिका असलेला दाखला देत आधुनिक राजकारणातला नारायण वाघ म्हणजे एकनाथ शिंदे असल्याचे सांगत समाचार घेतला. यावेळी
उपस्थितांमध्ये हशा पिकला. 



     

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.