जिल्हास्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांना प्रारंभ
जिल्हाधिकारी यांनी क्रीडा ज्योत प्रज्वलीत करुन केले उद्घाटन
महसूल शासनाचा महत्वाचा विभाग असून जिल्ह्यात येणाऱ्या अनेक घडमोडींना सामोरे जावे लागते. कामाच्या व्यस्ततेतून आरोग्याकडे लक्ष देता यावे, या दृष्टीने खेळाकडे वळावे. यामुळे मानसिक व शारीरीक स्वास्थ ठिक ठेवण्यास मदत होते. या क्रीडा स्पर्धेत सहभाग घेवून विजय मिळवावा. त्यासोबतच विभागीय व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धात जिल्ह्याचे नाव लौकीक करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.
19 व 20 फेब्रुवारी दरम्यान आयोजित जिल्हास्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांना आज मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल येथे प्रारंभ झाला. या कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी क्रीडाज्योत व दीप प्रज्वलित करुन केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी आशा पठाण, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे तर विशेष अतिथी म्हणून शालीनी इटनकर उपस्थित होत्या.
शरीर स्वास्थ जपण्यासाठी खेळाशिवाय दुसरा पर्याय नाही. दैनंदिन जीवनात प्रत्येकानी खेळासाठी थोडा वेळ काढावा. यास्पर्धेच्या निमित्ताने सराव करावा. खेळ व व्यायाम यांच्या अभावामुळे कमी वयातच व्यक्ती अनेक रोगांना बळी पडत आहे. म्हणून खेळाकडे वळा, असा संदेश त्यांनी दिला.
व्यस्त कामातून खेळासाठी वेळ दिल्यास स्वास्थ ठिक राहते. त्यासोबतच सांघीक भावनेने खेळ खेळा, त्यामुळे खिलाडूवृत्ती तयार होऊन कामात कितीही त्रास झाल्यास मन विचलीत होत नाही, असे अपर जिल्हाधिकारी आशा पठाण यांनी मार्गदर्शनपर भाषणात सांगितले.
प्रारंभी क्रीडा विषयक शपथ जिल्हाधिकारी यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली. पथसंचलनात सावनेर संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. शालीनी इटनकर यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी 100 मीटर महिलांची दौंडीने स्पर्धेचा प्रारंभ झाला. या स्पर्धेत नागपूर(ग्रामीण), नागपूर शहर, सावनेर, काटोल, उमरेड, मौदा, रामटेक, जिल्हाधिकारी कार्यालय या संघाचा समावेश आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपजिल्हाधिकारी मीनल कळसकर यांनी केले तर आभार उपविभागीय अधिकारी शेखर घाटगे यांनी मानले.